सुधाकर बडगुजर यांच्या आरोपांबाबत खुलासा: ईव्हीएम बदलाबाबत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

मतदान यंत्र बदलाबाबत बडगुजर संशयात; आयोगाने दिले स्पष्टीकरण

लाल दिवा -नाशिक, दि. २२.११.२०२४ /१२५ नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार श्री. सुधाकर बडगुजर यांनी मतदान प्रक्रियेतील ईव्हीएम मशिन बदलण्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. दि. २०.११.२०२४ रोजी झालेल्या मतदानात काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन्स बदलण्यात आली होती. याबाबत श्री. बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना न देता ही मशिन्स बदलण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच, ही मशीन्स स्कॅन केलेली असून बाहेरील स्रोतांमार्फत हॅक करण्याची शक्यता असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली.

 

या आरोपांना उत्तर देताना निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ (२nd Randomisation) उमेदवारांच्या उपस्थितीत पार पडली होती. त्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रासाठी कोणती कंट्रोल युनिट (CU), बॅलेट युनिट (BU) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) युनिट नियुक्त करण्यात आली याची यादी सर्व उमेदवारांना देण्यात आली होती. राखीव यंत्रांची माहितीही या यादीत समाविष्ट होती.

 

मतदानाच्या दिवशी, मॉक पोल आणि प्रत्यक्ष मतदान सुरू असताना काही मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि भेल अभियंत्यांच्या देखरेखीखाली ही बिघडलेली यंत्रे बदलण्यात आली. बदललेल्या यंत्रांची माहिती पुढीलप्रमाणे:

ही बिघडलेली यंत्रे क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे असलेल्या राखीव यंत्रांमधून बदलण्यात आली. ही प्रक्रिया उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली असून त्यांनी कोणतीही हरकत घेतली नाही. त्यानंतर, उभ्या असलेल्या मतदारांच्या संख्येइतके अभिरुप मतदान घेण्यात आले. यंत्रे बदलल्याची नोंद संबंधित मतदान केंद्राध्यक्षांनी नमुना १७C मध्ये केली असून त्यावर उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत. ही माहिती केंद्राध्यक्ष दैनंदिनी आणि केंद्राध्यक्षाच्या अहवालात (भाग ४ व ५) देखील नमूद करण्यात आली आहे.

 

दि. २१.११.२०२४ रोजी निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसमक्ष नमुना १७A, १७C आणि केंद्राध्यक्ष दैनंदिनीची पडताळणी करण्यात आली. यामध्ये यंत्रे बदलण्यात आलेल्या मतदान केंद्र क्रमांक २२१ चाही समावेश होता. या पडताळणीत कोणतीही विसंगती आढळून आली नाही. इतर मतदान केंद्रांबाबतही पडताळणीची आवश्यकता नसल्याचे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी नमूद केले. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेमध्ये वापरण्यात आलेली ईव्हीएम यंत्रांची संपूर्ण यादी उमेदवार/प्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, संपूर्ण प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडण्यात आली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!