चिक्याचा ‘खेळ’ संपला! दिड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद
पोलिसांना आव्हान देणारा चिक्या अखेर गजाआड
लाल दिवा-नाशिक ,१९:– गेल्या दिड वर्षांपासून पोलिसांना चकवा देत सुट्टा फिरणाऱ्या, दरोडा आणि खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी चिक्या उर्फ मितेश संतोष परदेशी याला अखेर गुन्हे शाखा युनिट २ ने बेड्या ठोकल्या आहेत. या धाडसी कारवाईने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या कुख्यात गुन्हेगाराचा ‘खेळ’ संपला असून, पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
नाशिक शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याच्या सूचनांनुसार, गुन्हे शाखा युनिट २ सतर्क होती. याच सतर्कतेचे फळ म्हणून चिक्याला जेरबंद करता आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी, सपोउपनि गुलाब सोनार यांना गुप्त माहिती मिळाली की, उपनगर पोलीस ठाण्यातील गुरनं. ३०२/२०२३ अन्वये नोंदवलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी चिक्या हा नाशिकमध्येच लपून बसला आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. अखेर, तो अंबड एमआयडीसीतील गरवारे चौकात असल्याची खात्री पटल्यावर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. पोलिसांना पाहताच चिक्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या चातुर्यापुढे तो टिकू शकला नाही.
चिक्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगार नियंत्रण कायद्याअंतर्गतही गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपासासाठी त्याला उपनगर पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांनी गुन्हे शाखा युनिट २ च्या टीमचे कौतुक केले आहे. या कारवाईत सहभागी सपोनि डॉ. समाधान हिरे, पोउनि मुक्तारखान पठाण, सपोउपनि गुलाब सोनार, पोहवा अतुल पाटील, मनोज परदेशी आदींसह सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर आळा बसेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.