नाशिक ग्रामीण पोलिसांची दक्ष कारवाई: अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या
अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल
लाल दिवा-नाशिक,१८:-गुळवंच, ता. सिन्नर (प्रतिनिधी)** – नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (स्थागुशा) पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध करत गुळवंच परिसरातून एका अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जीवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारी कारवायांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थागुशाच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
१८ जानेवारी २०२५ रोजी मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक संशयित इसम अवैध अग्निशस्त्र बाळगून फिरत असल्याचे समजले. यावरून स्थागुशाच्या पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुळवंच परिसरात सापळा रचला.
या कारवाईत राहुल तुळशीराम गुरकुले (वय २६, रा. दगडवाडी, गुळवंच) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीत एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जीवंत काडतूस सापडले. राहुल याच्यावर एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, राहुल याच्यावर यापूर्वीही एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत आणि म.पो.का.क. १२२ अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पाडण्यात आली. पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सपोनि संदेश पवार, सपोउनि नवनाथ सानप, पो. अंम. विनोद टिळे, प्रकाश कासार, राहुल साळवे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.
<span;>या यशस्वी कारवाईमुळे परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना चाप बसला असून, पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.