तोंडात नोटा कोंबण्याचा प्रयत्न करणाऱ्या परिवर्तन पॅनलच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल…!
लाल दिवा : निवडणूक निर्णय अधिकारी कक्षा जबरदस्तीने घुसून आतून कडी लावून घेत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी परिवर्तन पॅनल च्या वं पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी गौतम बलसाने (वय 54, रा. मधुर मंगल अॅव्हेन्यू, कामगारनगर, सातपूर) हे सहकार खात्यातील अधिकारी आहेत. दि. 1 ते 2 जूनदरम्यान सारडा सर्कल येथे नॅशनल ऊर्दू हायस्कूलजवळ असलेल्या विभागीय निबंधक सहकारी संस्था कार्यालयात होते. दरम्यान, बलसाने व त्यांचे सहकारी पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेचे शासकीय कर्तव्य पार पाडत होते.
त्यावेळी संशयित हेमंत गायकवाड, अशोक सातभाई, श्याम गोहाड, गंगाधर उगले, तानाजी गायधनी, विश्वास चौघुले, निवृत्ती दत्तात्रेय अरिंगळे, श्रीराम, आदेश पवार व त्यांचे अनोळखी 25 ते 30 साथीदार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कक्षात जबरदस्तीने घुसले. त्यांनी शिवीगाळ व दमदाटी करून कक्षाच्या दरवाजाची कडी आतून लावून घेतली, तसेच बाहेर जाण्यास मज्जाव त्यांना घेराव घातला. त्यादरम्यान तेथील महिला कर्मचाऱ्यांच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून बलसाने यांच्या तोंडात बळजबरीने नोटा कोंबण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा व्हिडिओ बनवून तो समाजमाध्यमांवर प्रसारित करून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात 25 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत.