सावकारीच्या जाळ्यात सापडला गृहस्थ, इंदिरानगर पोलिसांकडून दोघांवर गुन्हा दाखल

आरोपींच्या घरातून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त,

लाल दिवा-नाशिक,दि‌२५:-:(प्रतिनिधी) पैशाच्या हव्यासापायी काही जण कोणत्याही थराला जाऊ शकतात याचे उत्तम उदाहरण इंदिरानगर परिसरात उघडकीस आले आहे. येथे दोन जणांनी एका व्यक्तीला सावकारीच्या जाळ्यात अडकवून त्याचे आर्थिक शोषण केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी श्री. मंगेश मधुकर वैष्णव, जे उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका येथे मुख्य लिपीक म्हणून कार्यरत आहेत, यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कार्यालयात श्री. चंद्रकांत नारायण पवार यांनी एक तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जात त्यांनी अनिल दामू जगताप आणि लक्ष्मण दामू जगताप, दोघेही रा. आनंद नगर, पाथर्डी फाटा, नाशिक, यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. 

श्री. पवार यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले होते की, त्यांनी आरोपींकडून काही रक्कम कर्ज म्हणून घेतली होती. मात्र, आरोपींनी त्यांच्याकडून अतिरिक्त व्याज आकारण्यास सुरुवात केली आणि त्यांचे आर्थिक शोषण करण्यास सुरुवात केली. 

या तक्रार अर्जाची दखल घेत इंदिरानगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत २९ मार्च २०२४ रोजी आरोपींच्या घरावर धाड टाकली. या धाडी दरम्यान पोलिसांना आरोपींच्या घरातून अवैध सावकारीशी संबंधित अनेक कागदपत्रे सापडली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री. पवार यांनी आरोपींना दिलेला १०० रुपयांचा स्टँप पेपर, भारतीय स्टेट बँकेचा चेक क्रमांक ८३५७५१ (दिनांक ०३/१०/२०२३) आणि चेक क्रमांक ८३५१९० (दिनांक ०७/०९/२०२४), ज्याची रक्कम ३,०१,८०० रुपये होती, तो देखील जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम, २०१४ मधील कलम २३, ३९, ४२ व ४५ सह भादंवि कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
1
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!