मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर बस स्थानक, तरीही दागिने चोरी
पोलीस ठाण्याच्या नाकाशीच दागिने चोरी, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
लाल दिवा-नाशिक, ९ नोव्हेंबर २०२४ – मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ असलेल्या बसस्थानकावरून एका महिलेच्या पर्समधून तब्बल १ लाख ३९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १:३० ते २:०० वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीस ठाणे जवळ असूनही अशा प्रकारे चोरी होणे हे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करते. नागरिकांच्या सुरक्षेची हमी देणारे पोलीस स्वतःच्या नाकाशी घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालू शकत नसतील, तर सामान्य नागरिकाचे काय?
फिर्यादी सौ. आशा जितेंद्र चौव्हान (वय ३२, रा. रूम नं. १०५, लोट्स होस्टेल जवळ, संतकबीर नगर, भोसला मिलटरी स्कुल जवळ, आनंदवली, नाशिक) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या आपले पती आणि दोन मुलांसह फलाट क्रमांक ३ वर मुंबईला जाणाऱ्या बसची वाट पाहत उभ्या होत्या. त्यांच्या गर्दीचा फायदा घेत कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील केशरी रंगाचे पॉकेट चोरून त्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. चौव्हान यांनी या घटनेची माहिती लगेचच पोलिसांना दिली, मात्र आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
चोरीला गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत १,३९,०००/- रुपये असून त्यात १६ सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र (५०,०००/-), २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि १० चांदीचे पैजण (५०,०००/-), १० ग्रॅम वजनाचे पॅडल (२५,०००/-), ५ ग्रॅम वजनाची अंगठी आणि १० ग्रॅम वजनाचे कानातले (१०,०००/-) आणि ४ तोळे वजनाचे मणी (४,०००/-) यांचा समावेश आहे.
याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३७/२०२४ भादंवि कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोनार हे तपास करत आहेत, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरूटे यांनी गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, पोलीस ठाण्याजवळच घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे असूनही चोरट्याला पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.