नाशिकमध्ये पब्जी कॅफेमध्ये रक्तपात; जुन्या वादातून तरुणावर कोयता हल्ला, भावासह बेदम मारहाण !
वाढती गुन्हेगारी: नाशिकमध्ये पब्जी कॅफे बनले रणांगण, तरुण गंभीर जखमी
लाल दिवा-नाशिक,दि.१५ (प्रतिनिधी): शहरातील समर्थनगर परिसरात बुधवारी रात्री एका पब्जी कॅफेमध्ये दारूच्या नशेत असलेल्या तीन जणांनी तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्याच्या भावासोबत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. रामराज्य अपार्टमेंट येथील या पब्जी कॅफेमध्ये रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा थरार रंगला. जुन्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
किरण देवीदास पवार (वय 26) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्या भावाचे नाव गणेश आहे. किरण आणि गणेश हे दोघे भाऊ मिळून हे पब्जी कॅफे चालवतात. बुधवारी रात्री किरण आणि गणेश हे कॅफेमध्ये काम करत असताना उमेश सुर्यवंशी, डिसुजा आणि त्यांच्यासोबत असलेले दोन साथीदार असे चार जण कारमधून कॅफेसमोर आले. दारूच्या नशेत असलेले हे तिघे आत शिरले आणि किरण आणि गणेश यांच्याशी वाद घालू लागले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण आणि आरोपींमध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या रागातूनच आरोपींनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. वाद विकोपाला गेल्यानंतर उमेश सुर्यवंशीने किरणवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात किरणच्या डाव्या कुक्षीला आणि मांडीला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, डिसुजा आणि त्याच्या साथीदारांनी गणेशला लाथाबुक्क्यांनी तसेच स्टूल आणि पेव्हर ब्लॉकने मारहाण करून गंभीर दुखापत केली. आरोपींनी कॅफेमध्ये तोडफोड करून नुकसानही केले आणि घटनास्थळावरून पसार झाले.
किरण आणि गणेश यांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी किरण पवार यांच्या फिर्यादीवरून गंगापुर पोलीस ठाण्यात उमेश सुर्यवंशी, डिसुजा आणि त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध भादंवि कलम 118(2), 352, 324(2-6), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक जुमडे यांनी दिली.
ही घटना समजताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.