विश्वासघात: ज्यांना न्याय द्यायचा होता, त्यांनीच लावला १० हजारांचा भाव! विभागीय अधिकाऱ्याच्या कुकृत्याने खळबळ.
सिस्टिमच भ्रष्ट! स्वस्त धान्याच्या दुकानासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचा भांडाफोड.
लाल दिवा-नाशिक, २४ सप्टेंबर २०२४:लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज नाशिकमध्ये एका मोठ्या कारवाईत विभागीय आयुक्त कार्यालयातील विभागीय तांत्रिक अधिकारी राजेंद्र भागवत केदारे (५७) यांना १०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. केदारे यांनी स्वस्त धान्य दुकानाच्या अपील प्रकरणात निकालाची प्रत देण्यासाठी १५,००० रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदार यांच्या भावाच्या पत्नी या महिला बचत गटाच्या अध्यक्ष आहेत. त्यांना जिल्हा पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकान मंजूर झाले होते. या निर्णयाविरुद्ध विभागीय आयुक्त कार्यालयात अपील दाखल करण्यात आले होते.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, केदारे यांनी अपिलाचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्याचे सांगितले आणि निकालाची प्रत देण्यासाठी १५,००० रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर १०,००० रुपयांवर सहमती झाली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क साधला.
पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून केदारे यांना तक्रारदाराकडून १०,००० रुपये घेताना रंगेहाथ पकडले.
केदारे यांच्याविरुद्ध नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी, पोलीस नाईक विलास निकम आणि चालक पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे यांचाही सहभाग होता.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर आणि अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी यांनी केले.
नागरिकांना आवाहन: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असेल तर त्यांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क साधावा. संपर्क क्रमांक: ०२५३२५७८२३०, टोल फ्री क्रमांक १०६४.