खाकीचा विश्वासघात! वृद्धाला लुटणाऱ्या ‘खोट्या’ पोलिसांचा सुळसुळाट, नाशिकमध्ये दहशत
आडगाव पोलीस बेफिकीर, नागरिकांमध्ये दहशत
लाल दिवा-नाशिक, दि. २६ नोव्हेंबर २०२४: प्रतिनिधी सारिका नागरे-खाकी वर्दीचा पवित्र रंग आता काळिमाने माखला जात आहे का? असा प्रश्न आडगावमधील एका धक्कादायक घटनेनंतर उपस्थित होत आहे. येथे दोन भामट्यांनी पोलिसांचा वेश धारण करून एका ६२ वर्षीय वृद्धाला लुटले आहे. ही घटना केवळ एका वृद्धावर झालेला अन्याय नाही, तर खाकी वर्दीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. पोलिसांच्या नावानेच दहशत निर्माण करणाऱ्या या ‘खोट्या’ रक्षकांमुळे आता सामान्य नागरिकांच्या मनात भीतीचे सावट पसरले आहे.
निवृत्ती माधवराव चौधरी हे २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दत्तमंदिराकडे निघाले होते. ओकारेश्वर गणेश मंदिराजवळ दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. काळे जाकीट, फ्रेंच दाढी, काळ्या सावळ्या रंगाचा एक आणि पाठीवर काळी सँग असलेला दुसरा; या दोघांनी पोलिसांचा वेश केला होता. “येथे खुनाची घटना घडली आहे, तपास सुरू आहे,” असे सांगत या भामट्यांनी चौधरी यांना गोंधळात टाकले आणि त्यांच्याकडील १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. चौधरी यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
आता प्रश्न असा आहे की, ज्या पोलिसांकडे नागरिक सुरक्षेची अपेक्षा करतात, तेच जर लुटारूंचा वेश घेऊन फिरू लागले तर सामान्य माणसाचे काय होईल? ही घटना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करते. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करणे आवश्यक आहे. नाहीतर खाकीवरील हा काळा डाग पुसला जाणार नाही आणि सामान्य नागरिकाच्या मनातील पोलिसांवरील विश्वास ढासळत राहील. सुरक्षेचे आश्वासन देणारी खाकी वर्दी आता भीतीचे प्रतीक बनू नये यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.