काँग्रेसचे ‘महालक्ष्मी’ विरुद्ध महायुतीची ‘लाडकी बहीण’ : राज्यात महिला मतदारांसाठी योजनांची लढाई …!
लाल दिवा-महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी महायुती आणि विरोधी काँग्रेस पक्षात महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी योजनांची लढाई सुरू झाली आहे.
महायुती सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत राज्यातील पात्र बहिणींना प्रतिमहिना १००० रुपये देण्याची घोषणा केली आहे.ही योजना सध्या चांगलीच गाजत असून, याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने ‘महालक्ष्मी’ योजना जाहीर केली आहे.
काँग्रेसच्या ‘महालक्ष्मी’ योजनेअंतर्गत, राज्यात सत्ता आल्यास महिलांना प्रतिमहिना ८००० रुपये देण्याची घोषणा महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी केली आहे.
याशिवाय, महिलांवरील अत्याचारांविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, बदलापूरसह देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी गुरुवारी काँग्रेसच्यावतीने दिल्लीतील संविधान चौकात आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात अलका लांबा यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत, अनेक गंभीर आरोप केले. भाजप अत्याचारी नेत्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाचा कायदा लागू करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.
एकंदरीत, राज्यात निवडणुकीचे वातावरण तापत असताना, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्यावर योजनांचा वर्षाव सुरू केला आहे. आता पाहणे हे आहे की, महिला मतदारांना कोणत्या पक्षाची योजना अधिक पटवून देते