विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर-पाटील यांच्या सोमवारी होणाऱ्या सुनावणीकडे लागले सर्व पोलीस दलाचे लक्ष ……..!
नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यापासून ते उपनिरीक्षकांपर्यंतच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे.
यामध्ये डॉ. बी.जी. शेखर-पाटील यांची पुणे मोटार वाहन विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली. डॉ. शेखर-पाटील यांची येत्या मे महिन्यात सेवानिवृत्ती असल्याने त्यांनी या बदलीविरोधात मॅटमध्ये याचिका दाखल केली आहे.
त्यावर येत्या सोमवारी (ता.१२) सुनावणी होणार आहे. दरम्यान, दत्ता कराळे यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक पदाचा पदभार गेल्या आठवड्यातच स्वीकारला आहे.
गेल्या आठवड्यामध्ये अपर महासंचालकांपासून ते विशेष पोलीस महानिरीक्षक, आयुक्त, अधीक्षकांच्या बदल्या गृहविभागाने केल्या आहेत. त्यानुसार राज्यातील बहुतांशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
यामध्ये ठाण्याचे सहआयुक्त दत्ता कराळे यांची नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी तर, डॉ. बी.जी. शेखर-पाटील यांची पुण्यात पोलीस मोटार वाहन विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाली आहे.
दरम्यान, डॉ. शेखर -पाटील हे येत्या मे महिनाअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. याच मुद्यावर डॉ. शेखर-पाटील यांनी मॅटमध्ये धाव घेत याचिका दाखल केली आहे. त्यांच्या या याचिकेवर येत्या १२ तारखेला सुनावणी होणार असून, बदलीला स्थगिती मिळते का, याकडे आता लक्ष आहे.
एप्रिल २०२२ मध्ये त्यांनी नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदाची जबाबदारी घेतली होती. या दरम्यान त्यांनी अंमलीपदार्थविरोधात दमदार काम केले.