कार्यकर्त्यांअभावी उमेदवारावर मेळावाच रद्द करण्याची आली नामुष्की ; विरोधकांमध्ये हशा तर उमेदवाराचे वाढले टेन्शन !
लाल दिवा-नाशिक,दि.६:-नाशिक (प्रतिनिधी)– शहरात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, प्रचाराच्या रणांगणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एका विद्यमान महिला आमदाराला कार्यकर्त्यांअभावी मेळावा रद्द करावा लागल्याची नामुष्की ओढावली आहे. या घटनेमुळे विरोधकांमध्ये जोरदार हशा पिकला असून, संबंधित आमदाराच्या भविष्याची चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. मोठ्या नेत्यांच्या सभा आणि रॅलींपूर्वी रंगीत तालीम म्हणून ठिकठिकाणी छोटे मेळावे आयोजित केले जात आहेत. अशाच एका मेळाव्याचे आयोजन आज दुपारी एका विद्यमान महिला आमदारांकडून करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, मेळाव्याची वेळ जवळ आली तरी कार्यकर्ते काहीं करता जमा होत नव्हते. नेत्यांच्या फोनाफानीचाही काही उपयोग झाला नाही. अखेर त्या ज्येष्ठ नेत्यांना फोन करून कार्यकर्त्यांअभावी मेळावा रद्द करण्यात येत असल्याचे लाजिरवाणीपणे कळवावे लागले. “मेळावा नंतर घेऊ,” असे सांगत परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या घटनेमुळे विरोधकांमध्ये जोरदार चर्चा आणि हशा पिकला आहे. संबंधित आमदाराचे भविष्य काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर विरोधक आपला एकतर्फी विजय होणार असल्याचे बोलू लागले आहेत. या घटनेमुळे सत्ताधाऱ्यांच्या गोटातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर संबंधित आमदारांकडून कोणतेही अधिकृत भाष्य करणण्यात आलेले नाही. पुढील काळात त्या कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.