स्वप्नांची घडी विस्कटली : गणपतीला निरोप देऊन रशिया परतलेल्या नाशिकच्या तरुणाचा अपघाती मृत्यू !
जेलरोडवर शोककळा : रशियात शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू
लाल दिवा-नाशिक रोड,दि.१२ :गणेशोत्सवाचा आनंद आणि निघतानाची गोड हुंकार क्षणात शोककळेत परिवर्तित झाली. रशियात वैद्यकीय शिक्षण घेणारा नाशिकचा एकमेव लाडका लेक, आई वडिलांच्या स्वप्नांचा आधार अभिषेक युवराज जाधव (२२) हा कजागिस्तानमध्ये झालेल्या एका भीषण कार अपघातात काळाच्या तोंडात गेला. गणेशोत्सव साजरा करून तो रशियातील आपल्या शिक्षणाला परतत होता.
अभिषेक हा रशियातील एका विद्यापीठात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तो काही दिवसांपूर्वी नाशिकला येऊन इंदिरा गांधी पुतळा जवळ, जेलरोड येथील आपल्या आई-वडिलांकडे राहत होता. सोमवारी (९ सप्टेंबर) सकाळी तो विमानाने रशियाला रवाना झाला होता. कजागिस्तान येथे तो आपल्या चार ते पाच मित्रांसह कारने प्रवास करत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या एका मोठ्या इमारतीच्या बांधकामाजवळून जाताना एक ट्रक अचानक रस्त्यावर आला, भरधाव वेगात असलेली अभिषेकची कार या ट्रकवर जाऊन आदळली.
या भीषण अपघातात कारमध्ये चालकाच्या शेजारी बसलेल्या अभिषेकचा जागीच मृत्यू झाला. त्याचे इतर मित्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या सिडको विभागात कार्यरत असलेल्या वडिलांचा अभिषेक हा एकुलता एक मुलगा होता. त्याला एक लहान बहीण आहे.
अभिषेकच्या आईने मागील महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक देखील लढवली होती. अभिषेकच्या अकाली निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. अभिषेकचा मृतदेह गुरुवारी (१२ सप्टेंबर) सायंकाळपर्यंत दिल्लीहून मुंबई आणि त्यानंतर नाशिक येथे आणण्यात येणार आहे.