आडगावमध्ये मोबाईल दुकानातून ३० हजारांची चोरी, आरोपी चोरीचे फोन विकायला निघाला अन् पोलिसांच्या जाळ्यात
चोरीचे मोबाईल कुठे विकले जात होते? पोलिसांचा शोध सुरू
लाल दिवा-नाशिक,दि.१०आडगाव: नाशिक जिल्ह्यातील आडगाव शहरात एका मोबाईल दुकानातून तब्बल 30 हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल चोरून पळून जाणाऱ्या चोरट्याला आडगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी चोरीचे मोबाईल विकण्यासाठी नाशिकमध्ये आला असताना पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. ही घटना 3 सप्टेंबर रोजी घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आडगाव येथील जुम्मा मशीद परिसरात राहणारे मोहसिन याकुब शेख हे रजा एंटरप्रायजेस नावाने मोबाईल दुरुस्तीचे दुकान चालवतात. 3 सप्टेंबर रोजी संध्याकाळी त्यांच्या दुकानातून पाच मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली. दुकान बंद करून घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानात आल्यावर शेख यांना ही चोरीची बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलीसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या नेतृत्वाखाली पथकाची स्थापना करण्यात आली.
या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी हा चोरीचे मोबाईल विकण्यासाठी नाशिक येथील मेडिकल फाटा परिसरात फिरत असल्याचे समजले. यावरून पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव करण उर्फ चिकल्या मुरलीधर बलसाने (वय 19, रा. सारिका हॉटेलजवळ, वसंतदादा नगर, आडगाव) असल्याचे सांगितले.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीचे सर्व पाचही मोबाईल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे. ही कामगिरी सपोनि निखील बाँडे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ, देवराम सुरंजे, दादासाहेब वाघ, निलेश काटकर, पोलीस अंमलदार सचिन बाहिकर, दिनेश गुंबाडे, निखिल वाघचौरे, अमोल देशमुख, मपोका वैशाली महाले यांनी पार पाडली.