शिवसेना महानगर प्रमुख नागरिकांची मागणी पूर्ण करणार का ?
सिडको : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे कार्य संपूर्ण समाजाला समजावे याकरिता मोठ्या उत्साहात सिडको परिसरात होळकर यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आला आहे. परंतु सदर पुतळ्यावर आद्यपर्यंत छत्री उभारण्याचे काम प्रशासनाने केलेले नाही. त्यामुळे ऊन, वारा, पावसात पुतळा नेहमी ताटकळत उभा असतो. सरते शेवटी समाज बांधव व नागरिकांनी प्रभागातील नगरसेवक व शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडे छत्री उभारण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. आता छत्री उभारण्याचे काम जयंतीच्या अगोदर होते की नाही ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिडको विभागा मध्ये रायगड चौक या ठिकाणी २० वर्षा पासून पूर्णाकृती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा आहे. हा पूर्णाकृती पुतळा उन्हामध्ये उभा असतो. त्यामुळे प्रशासनाने केलेली रंगरंगोटी खराब होत असते. त्यामुळे पुतळ्यास ऊन, वारा व पाऊस या पासून स्वरक्षण व्हावे. म्हणून प्रभागातील नगरसेवक या नात्याने सुधाकर बडगुजर यांनी प्रशासना कडून प्रस्ताव मंजूर करून आपल्या माध्यमातून सदर पुतळ्यावरती छत्री बसवून कायमस्वरूपी सावली करून मिळावी अशी मागणी भास्कराव जाधव, निलेश हाक, राजेंद्र काळे, किरण थोरात, दत्ते चिखले, तुकाराम खेमनार, साहेबराव कोळपे, राजेंद्र शिंदे, अतुल लांडगे आदींनी केली आहे.
प्रतिक्रिया
अहिल्याबाई होळकर पुतळ्यास छत्रीची मागणी नागरिक व समाज बांधवांनी केली आहे. त्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून जयंतीच्या आधी छत्री बसवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू असे आश्वासन त्यांना आम्ही दिले आहे.
सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना (उबाठा)….