गौतमी पाटील बद्दल डॉ. हेमलता पाटील काय म्हणाल्या !
लाल दिवा-नाशिक : गौतमी च्या पाटील या आडनावावरून बरेच रणकंदन सुरू आहे.पाटील नावाचा इतिहास,मर्दानगी, शालीनता, खानदानीपणा(अर्थात खानदान हा शब्द नेमका कुठून व का आला याच्याही बर्याच रसभरीत कहाण्या ऐकिवात आहेत)असो ..तर मुळ मुद्दा हा की पाटील नावाच्या बाई ला चित्रविचित्र हावभाव करीत थिरकने शोभा देत नाही मग ती परिस्थिती ने कितीही नाडलेली असो, अशिक्षित असो,तीने तीच्या आयुष्याचा निर्णय एका विशिष्ट परिस्थिती नुसार घेतला असो. जेंव्हा पोटाची भूक आणि समाजाची भूक तीला जगू देत नव्हती अशा वेळी एकाही पाटलाला किंवा चाबूकस्वारा ला तीला चांगले शिक्षण देऊन उच्चशिक्षित करावे जेणेकरून ती स्वतः च्या पायावर उभी राहून so called white colour job करेल असं कोणालाही कधीही वाटले नाही.समाजाकडून चारदोन थापड्या खाल्या नंतर आणि अनेक वार झेलल्या नंतर जर ती अचकट/विचकट हावभाव करीत तुम्हाला उघड चॅलेंज देत थेट तुमच्या डोळ्यात डोळे घालून तुम्हाला डोळा मारत तुमच्या खिशातले पैसे काढत असेल तर एकट्या गौतमी च्या नावाने बोटे मोडणे हा तुमचा शुद्ध पाखंडी पणा नाही का?
कारण तुम्ही तीच्या कार्यक्रमांना अगदी पोलिसांच्या लाठ्या खात हजेरी लावतात.तीच्या अदाकारी वर तुम्ही अगदी भान हरपून नाचता आणि नाचताना ही शुद्ध लावणी आहे का?यात कशी अदाकारी आहे? शृंगार रस आहे का भक्ती रस आहे?असा कसलाही विचार मनात न आणता कोणतीही चिकित्सा न करता तुम्ही बेभान होतात पण शो ला जातात हे नक्की. म्हणून तर गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आख्खे पोलिस स्टेशन बंदोबस्ताला ठेवावे लागते .बर ही गर्दी तोंडावर मास्क लावून आपली ओळख लपवत धिंगाणा करीत नाही तर खुलेआम नाचते कुदते.या गर्दीत कोण नसते? अगदी सगळे बारा बलुतेदार असतात.एक विशिष्ट समाज तीच्या नाचण्याला डोक्यावर घेत नाही यांत अगदी”कसकाय पाटील बरं हाय का?काल काय ऐकलं ते खरं हाय का?असे पाटील बुवा पण असतात.अगदी सगळेच असतात.काय नॅरेटिव्ह सेट झालाय बघा. मराठी चित्रपट सृष्टी उदयास आल्या पासुन नव्वद टक्के चित्रपटामध्ये पाटलाच्या वाड्यावर बायका जाऊन नाचल्या..पाटील त्या बायकांच्या अंगावर पैसे उधळत असताना घराची लक्षी डोळ्यांतले अश्रू लपवत तुळशी ला पाणी घालण्यात जन्मा चे सार्थक मानण्यात धन्य व्हायची. तीच्या माहेरी तीची आई exact तेच करायची.परत शेतातील दुसरी पाती/ तीसरी पाती ही भानगड वेगळीच .त्यातुनच मग “रोप आपलंच पण होईल वेगळं…” अशा पद्धतीची असहाय सहमती असायची.बायको ने घोशात रहायचे, व्रतवैकल्ये घरंदाज पणा जोपासायचा आणि पाटलाने तालुक्याच्या गावाला जाऊन दोन/ तीन घर करायची हे मराठी सिनेमांनी इमान इतबारे दाखवीले त्या बद्दल ना कुठल्या पाटलाला खंत वाटली ना खेद.सिनेमात दाखविले ते सगळेच पाटील असे होते का तर नक्कीच नाही काही गावाच्या न्याय निवाड्यात,वारकरी परंपरेला वाहून घेतलेले,रयतेच्या राजा शिवछत्रपतींना आपली निष्ठा वाहीलेले असे ही होते..पण बाह्य खाली पणाचा बराचसा रोख त्या काळी मराठी सिनेमांनी पाटलांवर लावला .हे सर्व फक्त पाटलांच्या बाबतीत होत होतं का? तर नक्कीच नाही समाजात जो कोणी प्रतिष्ठीत पैसे वाला होता तो हे शौक afford करू शकत होता. ज्याच्या हातात सत्ते चे ग्लॅमर होते त्याच्या साठी हे शौक भूषण होते. आता बरंच पुलाखालून पाणी गेले छानछौकिने अनेक साम्राज्ये उद्ध्वस्त झाली इतकी की खाण्याचे वांदे झाले.भावबंदकीने डोके वर काढले. दोनशे दोनशे एकर वर अनेक कुळे/ कोर्ट कचेर्या,मारामार्या आल्या.कष्टाच्या कमतरतेमुळे आणि शिक्षणाचा अनास्थेमुळे “घरी नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा”अशी दयनीय अवस्था झाली.पोपडे पडलेल्या भिंती हरणाच्या कातडीने झाकायच्या तरी किती?आणि मग तरूण पिढी एकदम ध्यानावर आली. आण्णासाहेब/ काकासाहेब/ दादासाहेब ..९६ कुळी/ ९९ कुळी या उतरंडीतुन बाजुला झाली.हो आम्ही मागासवर्गीय आहोत आम्हाला राजकारणात नको पण शिक्षणात/ नोकरीत आरक्षण हवं म्हणून आग्रही झाली.जमेल तिथे शिक्षण घेऊन पडेल ते काम करून स्वतःला सिध्द करु लागली.कोणतीही विशेष मेहेरबानी नसताना परदेशी जाऊ लागली आणि जग किती भव्य आहे हे स्वानुभवाने जाणुन घ्यायला लागली. चावडी वरच्या चौकटी बाहेर प्रचंड मोठे विश्व आहे आणि या विश्वात ९६/९९,अक्करमाशी ला जराही महत्व नाही हे लक्षांत यायला लागले…हा प्रवास इतका सोपा नव्हता वर्षानुवर्षे मनावर लावलेली पुटे काढून डोळसपणे जगा कडे बघताना आमच्या मुला मुलींची प्रचंड दमछाक झाली पण हो त्यांनी स्वतः ला सिद्ध केलं…आणि जग कवेत घ्यायची तयारी सुरु केली आता परत एका लिटमस टेस्ट चा प्रयोग तुमच्या वर सुरू झालाय हो याच गौतमी च्या रूपाने..परत एक युद्ध छेडले जातेय पाटील विरुद्ध चाबूकस्वार… बहूत सोची समझी चाल है ये…यात दोन्ही कडून बळी जाणार तो कष्टकरी समाजाचा…या षडयंत्रात परत आपले मुख्य प्रश्न विरून जाणार आणि जातीचे भाले परत टोकदार होणार… म्हणूनच एक देशमुखांची मुलगी आणि पाटलांची सुन म्हणुन कळकळीची विनंती त्या गौतमी चे आडनाव पाटील असो की चाबूकस्वार.ती फक्त नाचून पोट भरतेय.तीचा नाच बीभत्स असेल तर बघू नका.तिकडे जाऊ नका . हा वाद कुणी/ कशासाठी सुरू केलाय हे लक्षात घ्या असाच एक आचार्य मराठ्यांचे नाव घेऊन हिंदू धर्माचा तारणहार होऊन तुम्हाला संतांच्या शिकवणी पासुन कोसो दूर नेतोय.अध्यात्माचा ट्रॅप आणि घुंगरांचा पण ट्रॅपच. हा काही लोकांचा “गंदा है पर धंदा है..” तुम्ही त्यात अडकू नका..मोठे व्हा विचाराने,आचाराने..तुर्तास इतकेच