नागरिकांची पोलीस आयुक्त कार्यालय प्रत्यक्ष पाहणी: अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
१०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत पोलीसांचा अनोखा उपक्रम
लाल दिवा-नाशिक,२ :- मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी राबविलेल्या “नागरिकांची पोलीस आयुक्त कार्यालय प्रत्यक्ष पाहणी” या अभिनव उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिनांक ०१/०४/२०२५ रोजी या उपक्रमांतर्गत ५० ते ५५ तरुण-तरुणींनी पोलीस आयुक्त कार्यालयाला भेट दिली.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि उत्तरदायी बनविण्याच्या उद्देशाने दर मंगळवारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
भेटीदरम्यान, तरुण-तरुणींना आयुक्तालयातील विविध शाखांची माहिती देण्यात आली. गुन्हे शाखा, विशेष शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, चारित्र्य व पासपोर्ट पडताळणी शाखा, नियंत्रण कक्ष, परदेशी नागरिक नोंदणी शाखा, परवाना शाखा, तांत्रिक विश्लेषण शाखा, आस्थापना व प्रशासन शाखा, डायल ११२, कुंभमेळा सेल इत्यादी शाखांच्या कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात आली. जलद प्रतिसाद पथकाकडे असलेली विविध शस्त्रे, संरक्षण साधने आणि बुलेटप्रूफ वाहनांचीही पाहणी करण्याची संधी त्यांना मिळाली.
कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक आणि मनपा आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांनी तरुण-तरुणींशी संवाद साधला. लोकाभिमुख आणि कार्यक्षम पोलीस प्रशासनासाठी नागरिकांनाही पोलीस प्रशासनाची माहिती असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी कुंभमेळ्यात नागरिकांनी आणि तरुणांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या उपक्रमात एम.व्ही.पी. आणि आय.एम.आर.टी.च्या प्राध्यापक राहुल ठाकरे, प्राध्यापक हर्षल देशमुख, प्राध्यापिका श्रीमती राजश्री वडघुले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
पुढील “नागरिकांची पोलीस आयुक्त कार्यालय प्रत्यक्ष पाहणी” हा उपक्रम दिनांक ०८/०४/२०२५ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. नागरिक आणि विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या स्वागत कक्षात उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.