नाशिक मनपा संचिका व्यवस्थापनात आयुक्तांकडून नवे निर्देश
मनपा कामकाजात गती आणण्यासाठी संचिका व्यवस्थापनात बदल
लाल दिवा-नाशिक,दि.७:-नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात गती आणि पारदर्शकता आणण्यासाठी आयुक्त मनीषा खत्री यांनी संचिका व्यवस्थापनाबाबत नवे निर्देश जारी केले आहेत. संचिकांमधील त्रुटी आणि अस्पष्टतेमुळे निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सर्व विभागप्रमुखांना जारी केलेल्या परिपत्रकातून १० महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या सूचनांनुसार, प्रत्येक संचिकेत विषय, पान क्रमांक, पताका आणि प्रत्येक पानावर प्रकरणाचा विषय स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. तातडीच्या संचिकांवर ‘तातडीचा’ उल्लेख आणि पताका असणे बंधनकारक करण्यात आले आहे. टिपणीमध्ये संबंधित कायद्यातील तरतुदींसह स्पष्ट अभिप्राय नमूद करावा लागेल. फक्त स्वाक्षरी करण्याऐवजी, स्वाक्षरी करणाऱ्याचे नाव, पदनाम आणि कामाची निकड लिहिणे आवश्यक आहे. संचिकेतील कामांना प्रशासकीय मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, कामासाठी अर्थसंकल्पीय तरतुद, कामाची निकड आणि लेखा व लेखापरिक्षण विभागाचा अभिप्राय स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. कामाच्या आधी आणि नंतरचे जिओ टॅगिंग फोटो जोडणे आणि आवश्यकतेनुसार मंजूर दरपत्रक जोडणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
या नव्या निर्देशांमुळे संचिका व्यवस्थापनात सुधारणा होऊन प्रशासकीय कामकाजात गती आणि पारदर्शकता येईल, असा विश्वास आयुक्त खत्री यांनी व्यक्त केला.