जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा! दुसाने कुटुंबीयांना न्यायासाठी घोडके यांचे आंदोलन
दुसाने यांच्या आत्म्याला शांती मिळेल का?
लाल दिवा-नाशिक ,दि. ६:-(प्रतिनिधी) – पोलिसांच्या छळाला कंटाळून दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केलेल्या सुवर्णकार दीपक दुसाने यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. यामुळे संतप्त झालेल्या सुवर्णकार ओबीसी समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी 7 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
दुसाने यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ क्लिप बनवली होती, ज्यात त्यांनी पोलिसांकडून 3 लाख 70 हजार रुपयांची खंडणी आणि बिटको चौकात शारीरिक व मानसिक छळ झाल्याचा आरोप केला होता. दोन वर्षे उलटूनही पोलिसांचा तपास संथ गतीने सुरू असून, दुसाने कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही, अशी घोडके यांची तक्रार आहे.
घोडके यांनी म्हटले आहे की, “मी वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावरून या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, पोलिस यंत्रणा आरोपी पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर मराठा समाज आक्रमक झाला आणि तातडीने सीआयडी चौकशी सुरू झाली. परंतु, दुसाने आत्महत्या प्रकरणात पोलिस केवळ चालढकल करत आहेत.”
“आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ हा धडधडीत पुरावा असतानाही फेरतपासाची गरज काय?” असा सवालही घोडके यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, “आम्ही 7 जानेवारी रोजी जिल्हाधिकार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. परंतु, आम्हाला न्याय मिळणार नाही, अशी खात्री झाल्याने मी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजासाठी शहीद होण्याची माझी तयारी आहे.”
या घटनेमुळे नाशिकमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणी कोणती भूमिका घेतली आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.