कायद्याचे रक्षक की कायद्याचे भक्षक? भद्रकालीत गुटख्याचे साम्राज्य बिनधास्त!
नितीन ट्रेडर्स प्रकरण: केवळ हिमनगाचा टोक
लाल दिवा-नाशिक,दि.११:-(खास प्रतिनिधी) – भद्रकाली परिसराला जणू गुटख्याच्या धुराची एक वेगळीच चादर झाकून टाकली आहे. ‘नशा करू नका’ असे फलक झळकत असतानाच, त्याच फलकांच्या सावलीत गुटख्याचा धंदा बिनधास्तपणे फोफावत आहे. पोलीस प्रशासन मात्र या धुरातच हरवले आहे की, या धुराआडून काही ‘मिळते’ म्हणून डोळेझाक करत आहे, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
नितीन ट्रेडर्स नावाच्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून १३,४६० रुपयांचा गुटखा जप्त केला. ही घटना केवळ हिमनगाचा एक छोटासा भाग आहे. खऱ्या अर्थाने, हा संपूर्ण परिसरच ‘गुटखा साम्राज्या’च्या कब्जात आहे. पोलीसांच्या नाकाखाली, त्यांच्याच गस्तीच्या मार्गावर, या विषारी व्यापाराचे जाळे पसरले आहे. हे जाळे एवढे घट्ट विणले गेले आहे की, त्यातून कायद्याचीही सुई पार होऊ शकत नाही, असे चित्र आहे.
पोलीसांची भूमिका यात संशयास्पद आहे. ते कायद्याचे रक्षक आहेत की या बेकायदेशीर धंद्याचे भागीदार? हा प्रश्न विचारला जात आहे. काही पोलिस अधिकारी या धंद्यातून ‘हात’ मिळवत असल्याच्याही चर्चा रंगत आहेत. पोलीसांच्या महीना ‘पगारा’ व्यतिरिक्त ही ‘बोनस’ रक्कम कुठून येते, याचा तपास झालाच पाहिजे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या धंद्याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा आहे. नाहीतर, ‘पोलीसांची नजरच जर या धंद्यावर मेहरबान असेल, तर नागरिकांचे संरक्षण कोण करणार?’ हा प्रश्नच राहणार आहे. नाशिककरांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.