नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीचा उद्रेक: पोलीस प्रशासन कुंभकर्णाच्या झोपेत?
नाशिकमध्ये सुरक्षितता कोणाची जबाबदारी?
लाल दिवा-नाशिक,दि.५ : नाशिक शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला आहे. दिवसाढवळ्या महिलांना लक्ष्य करून चोरांकडून धाडसी चोऱ्या होत असताना पोलीस प्रशासन मात्र कुंभकर्णाच्या झोपेत असल्याचे चित्र आहे. रस्त्यांवरून चालणेही धोकादायक झाले असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस आयुक्तांनी यावर काय कारवाई केली, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “ज्याचे गेले त्याने पाहवे,” अशी वृत्ती पोलीस प्रशासनाची असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
- चोरीच्या घटनांचा सिलसिला:
गेल्या काही दिवसांत शहरात सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. प्रत्येक घटनेत चोरांची पद्धत सारखीच असल्याचे दिसून येत आहे. मोटारसायकलवरून आलेले दोन चोर महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळून जात आहेत. पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होत असल्या तरी, आरोपींना अटक करण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत.
- घटनाक्रमाचा थरार:
घटना १ (आडगांव, गु.र.नं. ३५९/२०२४): ४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७:३० वाजता धात्रक फाटा येथे शाळेच्या बसची वाट पाहत असलेल्या शिक्षिका अश्विनी सम्राट आणि विजया गांगुर्डे यांच्या गळ्यातील एकूण १ लाख ९५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र आणि सोन्याची चेन काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेल्या दोन चोरांनी हिसकावून नेली. तपास अधिकारी: पोउनि निकम.
घटना २ (आडगांव, गु.र.नं. ३६६/२०२४): ४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ७:१५ वाजता नांदूर जत्रा रोडवरील संजीवनी बॅंकेट हॉलजवळ रिना कंगले यांच्या गळ्यातील १ लाख २६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र काळ्या रंगाच्या FZ मोटारसायकलवरून आलेल्या चोरांनी हिसकावले. तपास अधिकारी: वपोनि सचिन खैरनार.
घटना ३ (गंगापूर, गु.र.नं. २९१/२०२४): ४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८:३० वाजता सुनिता शिंपी यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत काळ्या रंगाच्या अपाचे मोटारसायकलवरून आलेल्या चोरांनी हिसकावली. तपास अधिकारी: निखिल पवार.ना
घटना ४ (इंदिरानगर, गु.र.नं. ४०९/२०२४)): ४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता सरला सोनवणे यांच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र आणि सोन्याची चेन काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या चोरांनी हिसकावली. तपास अधिकारी: सपोनि सोनार.
घटना ५ (देवळाली कॅम्प, गु.र.नं. १२५/२०२४): ३ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे ५ ते दुपारी २ या वेळेत मेहरान शरिफाबादी यांच्या घरातून ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोने आणि रोख रक्कम चोरीला गेली. तपास अधिकारी: पोहवा सी.एस. भोईर.
घटना ६ (नाशिकरोड, गु.र.नं. ६४८/२०२४): ४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ८:१५ वाजता शोभा पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरीला गेली. तपास अधिकारी: पोहवा वि.आर. टेमगर.
- पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह:
या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चोरीच्या घटना वाढत असतानाही पोलीस गुन्हेगारांना पकडण्यात अपयशी ठरत आहेत. पोलीस गस्त वाढवण्याची, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे अधिक मजबूत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी अपेक्षा आहे.