तलवारीचा terror! नाशिकरोडमध्ये तरुणाकडून ४ धारदार शस्त्रे जप्त!
नाशिकरोडमध्ये तलवारीचा साठा जप्त, १९ वर्षीय तरुण गजाआड!
लाल दिवा-नाशिक,दि.१२:-(नाशिकरोड) शहरात दहशत माजवण्याचा कट उधळला आहे! नाशिकरोड पोलिसांनी एका १९ वर्षीय तरुणाकडून तब्बल चार धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. चेहडी पंपींग रोडवरून संशयास्पद हालचाली करणाऱ्या या तरुणाला पकडण्यासाठी पोलिसांना थरारक पाठलाग करावा लागला.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या विशेष आदेशानुसार अवैध शस्त्रास्त्रांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत गुन्हे शोध पथकाचे अजय देशमुख यांना गुप्त माहिती मिळाली होती की, एक संशयित इसम खाकी रंगाच्या बॉक्समध्ये तलवारी घेऊन चेहडी पंपींग रोडवर येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला.
चेहडीशिव रस्त्यावर गणेश रामा हिरणवाळे (१९, रा. चेहडी पंपींग) या संशयित तरुणाच्या हालचाली पोलिसांना आढळल्या. पकडण्याचा प्रयत्न केल्यावर तो पळून जाऊ लागला. मात्र, पोलिसांनी त्याचा शिताफीने पाठलाग करत त्याला अटक केली. त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या चार तलवारींची किंमत ६,००० रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोहवा विजय टेमगर यांनी पंचनामा केला असून, अजय देशमुख यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (गु.र.नं. ६१०/२०२४, भा.ह.का. कलम ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५). पुढील तपास पोहवा टेमगर करत आहेत.
या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कारवाईत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, पोलीस निरीक्षक नाईकवाडे, सावंत, जगताप, सपोनि प्रविण सूर्यवंशी आदी अधिकारी सहभागी होते.