बनावट आयपीएसचा पर्दाफाश! ३६ लाखांची फसवणूक, अंबड पोलिसांची धडाकेबाज कारवाई!
लोकांचा विश्वास वाढवला, अंबड पोलिसांची धडाकेबाज कारवाई!
लाल दिवा-नाशिक,दि.३ : रेल्वेचा महानिरीक्षक असल्याचे भासवून एका लाँड्री कॉन्ट्रॅक्टरला ३६ लाख ६४ हजार रुपयांचे खोटे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या भामट्याचा अंबड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आरोपी गौरव रामअछेश्वर मिश्रा (वय ३७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दर्शन लल्लुराम कनोजिया (वय ४३) यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मिश्रा याने त्यांना रेल्वेचे टेंडर मिळवून देण्याचे आश्वासन देऊन जानेवारी २०१७ ते १३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने ३६ लाख ६४ हजार रुपये उकळले. मिश्रा हा सफारी ड्रेसमध्ये आणि त्याच्यासोबत सुरक्षारक्षक घेऊन येत असे. त्याने बनावट ओळखपत्र दाखवून स्वत:ला रेल्वेचा आयपीएस अधिकारी असल्याचे भासवले. त्यामुळे कनोजिया यांना त्याच्यावर विश्वास बसला. पैसे मागितल्यावर मिश्रा याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
अंबड पोलिसांनी कनोजिया यांच्या फिर्यादीवरून मिश्राविरुद्ध भा.दं.वि. कलम ३१८(४), ३१६(२), ३३६(२), ३३८, ३३६(३), ३१८(२), ३१९(२), ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पासलकर तपास करत आहेत. पोलीस उपनिरीक्षक घुनावत यांनीही घटनास्थळी भेट दिली. पोलिसांच्या या त्वरित कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.