गंधर्वनगरीतील घटनेनंतर पोलीसांची गस्त वाढवली
लाल दिवा-नाशिक,दि.३ :-नाशिकरोड गंधर्वनगरीत मध्यरात्री दारूच्या नशेत असलेल्या एका तरुणाने हैदोस घातला. जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याने दोन गाड्यांच्या काचा फोडल्या आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत गिते (२३, ड्रीम अव्हेन्यू, गंधर्वनगरी) असे आरोपीचे नाव आहे.
संग्राम फडके (४६, शिवआराधना सोसायटी) हे २ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता कामानिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी आपल्या होंडा जाझ कारमधून निघाले होते. त्याचवेळी दारूच्या नशेत असलेला अनिकेत गिते त्यांच्यासमोर आला आणि जुन्या भांडणाचा उल्लेख करत शिवीगाळ करू लागला. “तुला आज जिवंत सोडणार नाही!” अशी धमकी देत त्याने हातातील दगडाने फडके यांच्या गाडीच्या पुढच्या आणि मागच्या काचा फोडून टाकल्या. फडके गाडीतून बाहेर येईपर्यंत गितेने तिथेच असलेल्या अंबादास पगारे यांच्या स्कॉर्पिओ गाडीचीही काच फोडली. फडके यांनी आरडाओरड केल्यावर गिते पळून गेला.
फडके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गितेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे का, याचाही तपास पोलिस करत आहेत.
आरोपी अद्याप फरार, सीसीटीव्ही फुटेजचा शोध, पोलिसांचा कसून तपास सुरू…