बनावट रंग विक्रेत्याला रोखले, १ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
नाशिकमध्ये बनावट रंगाचा काळाबाजार उघड.
लाल दिवा-नाशिक,दि.२३ :-नाशिक: शहरातील नारायण बापू नगर येथे बनावट रंग विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १,१३,०५०/- रुपये किमतीचा बनावट रंगाचा मुद्देमाल जप्त केला आहे. संतोष लक्ष्मण दाभाडे (रा. फ्लॅट नं. १९/१, ओझाणी पार्क, त्रीमुर्ती नगर, हिरावाडी रोड, नवीन आडगांव नाका, संभाजी नगर रोड, नाशिक) असे अटक आरोपीचे नाव आहे.
दिनांक २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:५० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. बालाजी एंटरप्रायझेस, नारायण बापू नगर येथे काही जण बनावट रंगाचे डबे विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी संतोष दाभाडे याला रंगे विक्री करताना रंगेहाथ पकडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून ACE EXTERIOR EMULSION, TRACTOR UNO, ROYALE LUXURY EMULSION, SMART CARE DAMP PROOF आणि APEX DUST या नावांनी बनावट रंगाचे डबे विक्रीसाठी आणले होते. हे सर्व डबे प्रसिद्ध कंपनी एशियन पेंट्सच्या नावाने विकले जात होते.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत.