नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे टोल कंत्राटदारांना झटका, ९५ दिवस टोल वसुली बंद
टोलबंदीचे स्वागत, पण दुरुस्ती कायमस्वरूपी हवी – प्रवासी
लाल दिवा-नाशिक,दि.१९ : नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक खड्ड्यांमुळे प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) कडक पाऊल उचलले आहे. घोटी आणि वडपे टोल नाक्यांवरील टोल वसुली ९५ दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. या काळात थेट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोल वसुली करणार असून, त्यातून महामार्गावरील खड्डे बुजवण्यात येणार आहेत.
महामार्गाच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार हेमंत गोडसे यांनी या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही कारवाई केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नाशिक-मुंबई महामार्गाची अवस्था खूपच वाईट झाली होती. पावसाळ्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. यामुळे वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. अपघातांचे प्रकारही वाढले होते.
या पार्श्वभूमीवर माजी खासदार हेमंत गोडसे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी महामार्गाची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी केली होती. अन्यथा टोल वसुली बंद करावी, असा इशाराही त्यांनी दिला होता.
त्यांच्या या मागणीची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही कारवाई केली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.