व्यावसायिकाला २५ लाखांची खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी; देवरेसह दोघांवर गुन्हा

## सावकारीच्या जाळ्यात अडकवून २५ लाखांची खंडणी; व्यावसायिकाला धमक्या, कुटुंबासह पळून जाण्याची वेळ 

लाल दिवा-नाशिक,दि.२६:- (प्रतिनिधी) – शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाला सावकारीच्या जाळ्यात अडकवून तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिवे मारण्याच्या धमक्या दिल्यानंतर व्यावसायिकाला कुटुंबासह शहराबाहेर पळून जावे लागले आहे. ही घटना २२ मार्च २०२२ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडली असून इंदिरानगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन विलास बरडे (वय ३९, रा. कंदुरी हॉटेल, पेठे नगर कॉर्नर, इंदिरानगर) असे पीडित व्यावसायिकाचे नाव आहे. तर वैभव यादवराव देवरे (वय ३९, रा. चेतनानगर, इंदिरानगर) आणि त्याचा मेहुणा निखील नामदेव पवार (वय ३०, रा. स्वामी विवेकानंद चौक, राणेनगर, सिडको) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

बरडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांनी देवरे यांच्याकडून ४.५ लाख रुपये कर्ज घेतले होते. या रकमेचे व्याज आणि दंड म्हणून आरोपींनी १४ लाख रुपये वसूल केले. त्यानंतरही बरडे यांच्याकडे आरोपींनी २५ लाख रुपयांची मागणी करत धमक्या देण्यास सुरुवात केली. आरोपींनी बरडे आणि त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांना भीतीपोटी नाशिक सोडून पुण्यात जावे लागले. 

बरडे यांनी धाडस करत इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा क्रमांक ३४६/२०२४ अन्वये भादंवि कलम ३८४, ३८५, ३२४, ४५२, ३२३, ३४१, ५०४, ५०६, ३४ आणि महाराष्ट्र सावकारी कायदा २०१४ चे कलम ३९, ४५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!