शालिमार येथील अनधिकृत २४ पत्र्यांची दुकाने हटविली, वाहतुकीतला मोठा अडथळा दूर….. अतिक्रमण विभागाच्या करुणा डहाळे यांची पुन्हा एकदा डॅशिंग कामगिरी…!

लाल दिवा, ता. ४ : नाशिक महानगरपालिका पश्चिम विभागीय कार्यालय अंतर्गत शालिमार येथे आज दि. ४ मे रोजी २४ अनधिकृत दुकानांवर कारवाई करण्यात आली. शहरातील महत्त्वाच्या मार्गावरील अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमण काढण्याचा आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिला आहे. त्यानुसार उपआयुक्त (अतिक्रमण) करुणा डहाळे यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त मदन हरिश्चंद्र, पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. गेल्या २६ वर्षांपासुन वाहतुकीस अडथळा ठरणारे शालिमार भागातील कब्रस्तानला लागून असलेल्या अनधिकृत २४ पत्र्यांची दुकाने अतिक्रमण पथकामार्फत हटविण्यात आली आहेत. अतिक्रमण विरोधी पथकाने दोन जेसीबींच्या सहाय्याने कारवाई करत अऩधिकृत दुकाने जमिनदोस्त केली आहेत. 

मनपा प्रशासनाने सर्व गाळेधारकांना सूचना दिली होती. कब्रस्तान जागेच्या लगत आठ ते दहा गाळे झोपडपट्टी विभागात होते. त्या ठिकाणच्या पक्या बांधकामातील व्यावसायिक वापराचा भाग मनपाने तोडला आहे. प्रत्यक्ष शालीमारचा परिसर हा गेल्या काही वर्षात अतिक्रमणांनी झाकलेला दिसत होता. कालिदास कलामंदिराच्या रस्त्याच्या कडेला कपडे, शूज यासह इतर दैनंदिन साहित्यांची अनेक दुकाने थाटण्यात आली होती. त्यामुळे सदर ठिकाणी वाहतुकीस बराच अडथळा निर्माण होत होता. सर्व सामान्य जनतेस पायी चालण्यासही कठीण झाले होते. सदर कारवाईदरम्यान नवीन नासिक आणि सातपूरचे विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील, पंचवटी विभागाचे नरेंद्र शिंदे, पूर्व विभागाचे राजाराम जाधव यांच्यासह सहा विभागांचे अतिक्रमण पथक आणि अतिक्रमण विभागाचे पोलीस पथक यांचा कारवाईत सहभाग होता. यावेळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या कारवाईच्या निमित्ताने महानगरपालिकेने पुन्हा एकदा अतिक्रमण करणा-या नागरिकांना इशारा दिला आहे. स्वत:हून अनधिकृत बांधकाम अथवा पत्र्याचे शेडचे अतिक्रमण काढून घेण्यात यावे अन्यथा अतिक्रमण पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल आणि कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसुल करण्यात येईल, अशी माहिती उपआयुक्त (अतिक्रमण) करुणा डहाळे यांनी दिली आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!