टिटवाळ्यातून इको चोर पकडले; गुन्हेशाखा युनिट २ची कामगिरी
तोडकर यांचे युनिट २ झाले सक्रिय; इको चोर पकडले
लाल दिवा-नाशिक,दि.६:- – नाशिक शहरात चारचाकी वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर गुन्हेशाखा युनिट २ने अशीच एक कामगिरी करत टिटवाळ्यातून दोन इको चोरट्यांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चोरीची इको कार आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२ मार्च २०२५ रोजी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे एका इको गाडीच्या चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हेशाखा युनिट २ने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांना चोरी करणाऱ्या दोन संशयितांचा माग लागला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी टिटवाळ्यातील साईराज चाळ येथे सापळा रचला. या कारवाईत प्रभास राजुसिंग जुन्नी (वय २७, रा. साईराज चाळ, टिटवाळा) आणि सोनुसिंग साकुरसिंग तिलपितीया (वय २२, रा. आजवारोड, एकता नगर, वडोदरा, हल्ली रा. साईराज चाळ, टिटवाळा) या दोघांना अटक करण्यात आली.
त्यांच्या ताब्यातून चोरीची इको कार (क्र. एमएच १५ जी. एक्स ०२१२) आणि गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर २२० मोटारसायकल (क्र. एमएच ०४ जी.बी ७७१९) जप्त करण्यात आली. आरोपींनी गुन्हा कबूल केल्याने इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २चे सपोनि हेमंत तोडकर, सपोनि डॉ. समाधान हिरे, पोउनि यशवंत बेंडकोळी, पोहवा सुनिल आहेर, अतुल पाटील, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी यांनी पार पाडली.