धक्कादायक! सावकारीच्या विळख्यात हॉटेल वेटर, बायको-मुलींना जीवे मारण्याची धमकी!
कर्जाच्या जाळ्यात अडकून हॉटेल कर्मचारी त्रस्त, पोलिसांत तक्रार
लाल दिवा-नाशिक,दि.२५ : – गंगापुर पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल वेटरला सावकारीच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून तब्बल ८ लाखांची खंडणी वसूल करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी त्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली असून त्याच्या बायको-मुलींनाही जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केली आहे.
पोलीस निरीक्षक सुनिल जुमडे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापुर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. पीडिताने दिलेल्या माहितीनुसार, सुबोध शिल्प अपार्टमेंट, रामनगर येथे राहणाऱ्या दशरथ पंडीत साबळे (४४) या हॉटेल वेटरने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून सुनील महाजन, ज्योत्स्ना महाजन, दिपक महाजन आणि त्यांचे चुलत सासरे यांनी त्याच्याकडून वेळोवेळी १ लाख ३० हजार रुपये कर्ज म्हणून घेतले होते. या कर्जावर त्यांनी १० टक्के व्याज आकारून ८ लाख ४५ हजार रुपये रोख आणि ऑनलाईन पद्धतीने वसूल केले.
तरीही आरोपींनी दशरथ यांच्याकडे अजूनही ८ लाख रुपये बाकी असल्याचे सांगत त्याच्या राहत्या घरी येऊन धमक्या देण्यास सुरुवात केली. पैसे न दिल्यास त्यांनी दशरथ यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर त्याच्या पत्नीला “मी सांभाळीन” असे म्हणत त्यांच्या दोन्ही मुलींनाही जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपी दहशत निर्माण करण्यासाठी अंबड पोलीस स्टेशनमधून बोलत असल्याचे भासवून फोन करून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही देत आहेत. यामुळे घाबरलेल्या दशरथ यांनी अखेर धाडस करून पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल दिलीप पाटील यांना संपर्क साधला आणि गंगापुर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.
पोलीस निरीक्षक सुनिल जुमडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पुढील तपास करत आहे