दक्षतेचा आवाज, राष्ट्राचा विकास! नाशिकमध्ये ‘दक्षता जनजागृती सप्ताह २०२४’ ची जोरदार सुरुवात !
वालावलकरांचा दणका: भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालण्याचा निर्धार!
लाल दिवा-नाशिक,दि.२८: भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृतीचा मंत्र देत, ‘सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्र समृध्दी’ या ध्येयवाक्यासह नाशिकमध्ये ‘दक्षता जनजागृती सप्ताह २०२४’ ची जोरदार सुरुवात झाली आहे. २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत विविध उपक्रमांद्वारे या मोहिमेला गती देण्यात येणार आहे.
श्रीमती शमिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र यांनी आज सकाळी ११ वाजता पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ देऊन या विशेष सप्ताहाचा प्रारंभ केला. यावेळी माननीय राज्यपाल महोदयांनी पाठवलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखविण्यात आला.
नाशिक परिक्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख भागात भ्रष्टाचार विरोधी घोषवाक्ये असलेले बॅनर्स आणि पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात येत आहे. सर्व शासकीय, निमशासकीय आणि सहकारी संस्थांच्या कार्यालयात जनजागृतीपर भित्तीपत्रके लावण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासीबहुल भागांमध्येही भ्रष्टाचार निर्मुलन जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
- नागरिकांना आवाहन:
भ्रष्टाचार हा केवळ गुन्हा नाही तर तो समाजाच्या प्रगतीतील मोठा अडथळा आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने नागरिकांनीही संकल्पित व्हावे, असे आवाहन श्रीमती वालावलकर यांनी केले आहे. भ्रष्टाचारासंबंधी तक्रारी असल्यास, नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र यांच्याशी संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.
संपर्क:
टोल फ्री क्रमांक: १०६४
दूरध्वनी क्रमांक: ०२५३-२५७८२३० / २५७५६२८
ई-मेल: spacbnasik@mahapolice.gov.in
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, हीच या दक्षता जनजागृती सप्ताहामागची खरी प्रेरणा आहे.