आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी :- सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत…!
लाल दिवा-मुंबई, दि. १२ : आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ संवर्ग तसेच वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ पद भरतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. भरती प्रक्रिया युद्ध पातळीवर राबवून ठरवून दिलेल्या नियमानुसारच भरती करावी. त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड करता कामा नये व गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिल्या.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील जनतेला पुरविल्या जाणाऱ्या विविध आरोग्य सेवांचा तसेच विभागातील पद भरती प्रक्रियेचा आढावा डॉ. सावंत यांनी पुणे येथून दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आयोजित बैठकीत घेतला. बैठकीस अतिरिक्त संचालक (कुटुंब कल्याण) डॉ. नितीन अंबाडेकर, तर दृकश्राव्य प्रणालीद्वारे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक धीरज कुमार, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, संचालक (वित्त) श्री. मेनन, अतिरिक्त संचालक (आरोग्य सेवा) स्वप्निल लाळे, विभागीय उपसंचालक, सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचाही मंत्री डॉ. सावंत यांनी आढावा घेतला. माता आणि भगिनींसाठी राज्यात राबविण्यात आलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित, बालकांच्या आरोग्यासाठी राबविण्यात आलेल्या जागरूक पालक – सुदृढ बालक, पुरुषांच्या आरोग्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे – वैभव महाराष्ट्राचे’ या अभियानांची अधिकृत आणि वयोगटानुसार सविस्तर माहिती सादर करावी, असे आदेशही त्यांनी दिले.
राज्यात ७०० आपला दवाखाना स्थापन करण्याचे विभागाचे लक्ष्य असून आतापर्यंत ३४७ आपला दवाखान्यांची स्थापना करण्यात आली आहे. उर्वरित लक्ष्य पूर्ण करण्यासाठी वेगाने पावले उचलावीत, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. त्याचप्रमाणे बांधकाम झालेली रुग्णालये जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत तसेच रुग्णालयात औषधांची उपलब्धता राहील याची सर्वांनी दक्षता घ्यावी. प्रत्येक तालुक्यात फिरता दवाखाना कार्यान्वित करण्याची कार्यवाही करावी. राज्यात विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या विविध रुग्णालयांची बांधकामे पूर्ण करावीत, असेही मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.