वृद्ध महिलेचा हात घुशीने रात्रभर कुरतडल्याने वृद्धेचा मृत्यू !
लाल दिवा, ता. २८ : झोपडीत झोपलेल्या वृद्ध महिलेचा हात एका घुशीने रात्रभर कुरतडल्याने जखमी झालेल्या वृद्धेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गंजमाळ परिसरात घडली.
याबाबत माहिती अशी की, गंजमाळ परिसरातील एका झोपडपट्टी येथे गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या वतीने गटारीचे काम सुरू असून, ते अपूर्ण अवस्थेत आहे. एका झोपडीत बबाबाई गायखे ही वृद्ध महिला एकटीच रहात होती. या आजीबाई गाढ झोपेत असताना गटारीतून आलेल्या घुशीने त्यांच्या हाताला कुरतडण्यास सुरूवात केली. गायखे या आजारी व अशक्त असल्याने त्या घुशीचा प्रतिकार करू शकल्या नाही.
घुशीने रात्रभर त्यांच्या हाताच्या तळापासून ते मनगटापर्यंतचा संपूर्ण हात कुरतुडून त्यांना रक्तबंबाळ केले. सकाळी गायखे आजींच्या मुलांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांना सांगितली. डोके यांच्या मदतीने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा आज सकाळी मृत्यू झाला.