लोकांचे रक्षक की भक्षक? माहिती अधिकाराच्या नावाखाली अधिकाऱ्याला २ लाखांची खंडणी!
RTI कार्यकर्त्याचा खंडणीचा कट उघड, वन अधिकाऱ्याला लक्ष्य!
लाल दिवा-नाशिक,दि.२४:-: नाशिकमध्ये माहिती अधिकाराच्या नावाखाली दादागिरी करून खंडणी वसूल करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पेठ वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्याला तब्बल दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. अकबर पापमियों सौदागर असे खंडणी मागणाऱ्याचे नाव असून त्याने वन अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावत त्यांच्याविरोधात उपोषण करण्याची धमकी देत ही रक्कम मागितली आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदागर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.
अरुण दशरथ सोनवणे असे खंडणी मागितल्या जाणाऱ्या वन अधिकाऱ्यांचे नाव आहे. सोनवणे हे पेठ वनपरिक्षेत्र, नाशिक येथे वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दि. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी त्यांना सौदागर याने ९९६०९५००८९ या क्रमांकावरून फोन केला. सौदागरने स्वतःला माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून ओळख करून दिली आणि सोनवणे यांनी पेठ वनपरिक्षेत्रातील कामात मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी या मागणीसाठी तो दि. ११ नोव्हेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालय येथे उपोषणाला बसणार असल्याचे त्याने सांगितले.
तसेच, हा वाद मिटवण्यासाठी सोनवणे यांनी त्याला दोन लाख रुपये द्यावेत, अशी मागणीही सौदागरने केली. सोनवणे यांनी न जुमानता थेट नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक गिरी यांनी सोनवणे यांची तक्रार ऐकून सौदागर विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३८४ (खंडणी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
सध्या पोलीस उपनिरीक्षक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक सौदागरचा शोध घेत आहे. लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस उपायुक्त (जोन २) मोनिका राऊत यांनी व्यक्त केला.