कार्टून नाही ऍनिमे! अक्षयची शेवटची स्टोरी देईल क्रांतीची ठिणगी?
शेवटची ऍनिमे स्टोरी लिहून, घेतला अंतिम श्वास…
लाल दिवा-नाशिक : २३ जानेवारी २०२५ (हर्षद पगारे)
कल्पनांच्या रंगीत जगात रमणाऱ्या एका तरुणाची कहाणी आज अश्रूंनी लिहिली जात आहे. नाशिकच्या जयभवानी रोड भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे, जिने संपूर्ण समाजाला अंतर्मुख होऊन आपल्या पारंपरिक दृष्टिकोनावर विचार करायला भाग पाडले आहे. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी अक्षय देविदास घायवटे या प्रतिभावान तरुणाने १६ जानेवारी रोजी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्याच्या जाण्याने एक वेदनादायी रहस्य उलगडले. मृत्यूपूर्वी काही दिवस आधी, अक्षयने आपल्या आई-वडिलांकडून एक वही आणि पेन मागितला होता. त्याने आपली पहिली आणि शेवटची ऍनिमे स्टोरी लिहिण्यास सुरुवात केली. खालावत चाललेल्या प्रकृतीमुळे तो ती पूर्ण करू शकला नाही, पण आपल्या भावाकडून ती प्रकाशित करण्याचे वचन घेऊन या जगाचा निरोप घेतला.
अक्षयची ही कहाणी केवळ दुःखदच नाही, तर विचार करायला लावणारी आहे. एका सर्वसामान्य रिक्षाचालकाच्या कुटुंबातील अक्षयला नेहमीच लवकर नोकरी करून स्थिरावण्याचा सल्ला दिला जात असे. पण त्याचे मन मात्र ऍनिमेच्या जादुई जगात रमले होते. लहानपणापासूनच त्याला ऍनिमेचे वेड होते. “कार्टून बघून काय मिळणार?” असे घरच्यांचे टोमणे ऐकूनही तो ऍनिमेमधील कथानक आणि पात्रांमध्ये हरवून जात असे. तो नेहमी सांगायचा, “ऍनिमे म्हणजे कार्टून नाहीत.” त्याला ऍनिमे लेखक व्हायचे होते, पण समाजाच्या दबावाखाली त्याचे स्वप्न गुदमरले.
अक्षयने लिहिलेली अपूर्ण ऍनिमे स्टोरी एका मुलाची आणि डॉल्फिनची आहे, जी त्यांना एका रहस्यमय सोनेरी जगात घेऊन जाते. ही कथा कदाचित अक्षयच्या स्वतःच्या आंतरिक जगाचे, त्याच्या अपूर्ण स्वप्नांचे प्रतिबिंब असावी. त्याने या कथेतून त्याच्या मनातील गोष्टी व्यक्त केल्या, ज्या तो वास्तवात करू शकला नाही.
अक्षयच्या निधनाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आपण कलात्मक स्वप्नांना किती दिवस दडपून ठेवणार? अशा प्रतिभावान तरुणांना योग्य व्यासपीठ आणि संधी मिळवून देण्यात आपण का कमी पडतो? भारतात ऍनिमेला केव्हा गांभीर्याने घेतले जाईल? अक्षय
ने आपल्या जाण्याने एक ठिणगी पेटवली आहे. ही ठिणगी कदाचित एका क्रांतीची सुरुवात असेल, भारतात एका स्वावलंबी ऍनिमे उद्योगाची पायाभरणी करेल, अशी आशा बाळगूया.