मिठाई विक्रेत्यांनी भेसळ विरहित पदार्थाचीच विक्री करावी….बाबासाहेब पारधे…!
लाल दिवा-नाशिक, दि.७:दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व दुध विक्रेते, स्विटमार्टधारक व किरकोळ दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेते यांनी उच्च गुणप्रतीचे, भेसळ विरहित व मुदतपूर्व दिनांक नमूद असलेलेच दुग्धजन्य पदार्थ विक्री करावेत. असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय दुध भेसळ प्रतिबंधक समिती, नाशिक बाबासाहेब पारधे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
दुधात होणाऱ्या भेसळीला पायबंद घालण्यासाठी 28 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. 31 ऑक्टोबर 2023 रोजी अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात दुरदृष्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत व श्री. तुकाराम मुंढे, सचिव (पदु) यांनी दिलेल्या सूचनेनुसार दुध भेसळीबाबात धडक मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्हास्तरीय दुध भेसळ प्रतिबंधक समिती मार्फत आजमितीस जिल्ह्यात वेगवेगळया 61 ठिकाणी दुध व दुग्धजन्य पदार्थांचे नमूने तपासणीची कार्यवाही करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात गुजरात राज्यातून येणाऱ्या खवा/मावा व इतर दुग्धजन्य पदार्थ तपासणी करून जिल्हास्तरीय समिती मार्फत अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.
अन्न पदार्थ भेसळीबाबत काही गोपनीय माहिती असल्यास नागरिकांनी सह आयुक्त अन्न, औषध प्रशासन व दुग्ध व्यवसाय, नाशिक विभागाशी संपर्क साधावा असेही अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय दुध भेसळ प्रतिबंधक समिती, नाशिक बाबासाहेब पारधे यांनी कळविले आहे.