स्वप्नांचा चुराडा: इथेनॉल प्रकल्प, २०० कोटींचे आमिष आणि विश्वासघाताची कहाणी !
- आमिषाला बळी पडू नका: विश्वासघात करणाऱ्यांना ओळखा
लाल दिवा-नाशिक,दि.१८: शहरातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेची ९३ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत फिर्यादी रेणुका प्रशांत भावसार (वय ४०, गंगापूर रोड, नाशिक) यांना आरोपी पंकज प्रशांत भावसार (रा. यशवंत हाइट्स, दांडेकर नगर, पिंपरी चिंचवड, पुणे), किरण चौधरी (रा. दिक्षीत वाडी, जळगाव), शमा अब्दुल पिंजारी (रा. कुर्ला, मुंबई) आणि विदेशपाल सिद्धू (रा. घाटकोपर, मुंबई) यांनी संगनमत करून फसवणूक केली.
आरोपी पंकज भावसार याने फिर्यादी आणि त्यांच्या पतीचा विश्वास संपादन करून स्वतःच्या नावावर कर्ज मिळवण्यासाठी मदत करण्याचे आमिष दाखवले. तसेच फिर्यादींना इथेनॉल प्रकल्पासाठी भारतीय विश्वकर्मा जनहित सेवा समिती ट्रस्ट, मुंबई यांच्याकडून २०० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
या आमिषाला बळी पडून फिर्यादींनी वेळोवेळी आरोपींना रोख आणि बँक खात्याद्वारे एकूण ९३,८५,०००/- रुपये दिले. मात्र, आरोपींनी कर्ज मिळवून न देता फिर्यादींना दिलेले पैसेही परत केले नाहीत.
याप्रकरणी फिर्यादी रेणुका भावसार यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जुमडे यांच्या आदेशानुसार गंगापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि निखिल पवार या प्रकरणाचा तपास करीत आहेत.