सुराचा धाक आणि १५ लाखांची खंडणी! ‘मर्डर’ टोळीचा ‘खैरणार’ आणि ‘देवरे’चा हैवानियत: व्यापाऱ्याला धमकी – “पैसे नाही दिले तर…गेम ओव्हर!”
## सुरा दाखवत १५ लाखांची खंडणी! सराईत गुंड वैभव देवरेसह टोळीकडून व्यापाऱ्याला धमक्या, मारहाण
लाल दिवा-नाशिक,दि.२७ :- शहरातील खुटवडनगर परिसरात एका व्यापाऱ्याला गहाण ठेवलेले सोने परत न करता उलट त्याच्याकडून खंडणी वसूल करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सराईत गुंड वैभव देवरे याचे नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. देवरे आणि त्याच्या साथीदारांनी व्यापाऱ्याला स्कार्पिओ गाडीमध्ये बसवून अपहरण केले. तसेच सुरा दाखवत १५ लाख रुपये देण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्री. भाऊसाहेब नामदेव कदम (वय ४५) यांनी काही वर्षांपूर्वी हरीभाऊ खैरणार नावाच्या व्यक्तीकडे १९० ग्रॅम सोने गहाण ठेवले होते. मात्र, वेळोवेळी विनंती करूनही खैरणारने कदम यांना त्यांचे सोने परत केले नाही.
जेव्हा कदम यांनी आपले सोने परत मागितले तेव्हा खैरणारने त्याला उलट धमकावण्यास सुरुवात केली. खैरणारने त्याच्या साथीदार वैभव देवरे आणि इतर दोन अनोळखी इसमांसह कदम यांना स्कार्पिओ गाडीत बसवून अपहरण केले.
गाडीतच खैरणारने कदम यांना धमकी देत म्हटले की, “माझे व्याजाचे पैसे मिळून तुझ्याकडे माझे १५ लाख रुपये होतात. ते पैसे दिले नाही तर तुला सोने मिळणार नाही. गाडीत बसलेले हे तिघे आताच मर्डर केसमधून जामीनवर बाहेर आले आहेत. तुला घरी येऊन फाशी देऊ किंवा गाडीखाली चिरडून टाकू, कोणाला कळणार नाही.”
एवढेच नव्हे तर वैभव देवरेने कदम यांना सुरा दाखवत १५ लाख रुपये देण्याची धमकी दिली. त्यानंतर देवरे आणि त्याच्या साथीदारांनी कदम यांच्या घरी जाऊन घरातील खिडक्यांच्या काचा फोडल्या, दुचाकीचे नुकसान केले आणि कदम यांना बेदम मारहाण केली.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात हरीभाऊ खैरणार, वैभव देवरे आणि इतर दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, वैभव देवरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.