राज्य पोलिस स्पर्धेचा ४ फेब्रुवारीला प्रारंभ…….पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला राहणार उपस्थित….. ३५०० पोलिस खेळाडूची उपस्थिती….. १० फेब्रुवारीला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ…..!
लाल दिवा-नाशिक,ता.३:- महाराष्ट्र पोलिस दलाच्या राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा नाशिकमध्ये होत असून, स्पर्धेला रविवार (ता. ४) पासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचे संयोजन नाशिक शहर पोलिस आयुक्तालय करीत आहे. पोलिस दलाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन करण्याचा सन्मान शहर पोलिस आयुक्तालयास मिळाला आहे. स्पर्धा उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.
राज्यभरातील सुमारे साडेतीन हजार पोलिस खेळाडू स्पर्धेत सहभागी होत आहेत. दोन वर्षांपूर्वी कोरोना प्रादुर्भावामुळे पोलिस क्रीडा स्पर्धा होऊ शकलेल्या नाहीत. या वेळी स्पर्धांना प्रारंभ झाला असून, गेल्या डिसेंबरमध्ये विभागीय पोलिस क्रीडा स्पर्धा परिक्षेत्रानिहाय पार पडल्या. त्यानंतर आता राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा होत आहेत. या राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा नाशिकमध्ये होत आहेत.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिस आयुक्तालयातर्फे राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांचे नियोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांसाठी राज्यभरातील पोलिस आयुक्तालय, पोलिस अधीक्षक कार्यालयांसह विविध विभागांचे सुमारे साडेतीन हजार पोलिस खेळाडू नाशिक शहरात दाखल होतील. स्पर्धा हिरावाडीतील (कै.) मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल, पोलिस कवायत मैदान यासह विविध मैदानांवर पार पडणार आहेत. स्पर्धेचा समारोप १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. स्पर्धेसाठी महाराष्ट्र पोलिस दलाच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह राज्यभरातील वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
- अशा होतील स्पर्धा…
राज्य पोलिस स्पर्धांना ४ फेब्रुवारीला प्रारंभ राज्यभरातून येणार ३५०० पोलिस खेळाडू नाशिक शहरातील विविध क्रीडा संकुलांमध्ये स्पर्धांचे आयोजन १० फेब्रुवारीला स्पर्धेचा पारितोषिक वितरणाने समारोप.