लाडक्या बहिणींना मंत्रिपद मिळावे: सोनार समाजाची मागणी
महिला सक्षमीकरणासाठी वाघ, मिसाळ मंत्रिपदी: सोनार समाजाची अपेक्षा
लाल दिवा-नाशिक,दि.२९:-नाशिकरोड (प्रतिनिधी)सारीका नागरे– महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत महायुतीच्या विजयाचे निशाण फडकले असून, या विजयाचा जल्लोष सर्वत्र पसरला आहे. या यशाबद्दल सकल भारतीय सोनार समाज संघटन आणि सेतु बंधनशी संबंधित विविध संस्थांनी महायुतीतील घटक पक्ष आणि विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते मंत्रिमंडळाच्या स्थापनेकडे. या पार्श्वभूमीवर, आगामी मंत्रिमंडळात सोनार समाजाच्या दोन कर्तृत्ववान महिला नेत्यांना मंत्रीपद मिळावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य आ. चित्राताई वाघ आणि पुण्याच्या पर्वती मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आलेल्या आ. माधुरीताई मिसाळ यांना मंत्रिपदी संधी मिळावी, असा आग्रह सकल भारतीय सोनार समाज संघटनेने धरला आहे. संघटनेचे संस्थापक मिलिंद कुमार सोनार यांच्यासह राजाभाऊ सोनार, शांतारामशेट दुसाने, विकास शांताराम विसपुते, आत्माराम ढेकळे, दिनेश येवले, अर्चनाताई सोनार, विलासराव अनासाने, अशोकराव हिरुळकर, दिलीपराव महतकर, बालाजी सुवर्णकार, सुधाकरशेट भामरे, विवेक विभांडीक, संजय नारायण तळेकर, ॲड. अरुणराव सागळे, पुष्पाताई भामरे आदी मान्यवरांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे. पुण्यातील स्त्री शक्ती फाऊंडेशननेही या मागणीचे समर्थन केले आहे.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेची चर्चा सर्वत्र रंगली होती. या योजनेचा निवडणुकीवर निश्चितच प्रभाव पडला असून, महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभाग घेतला. भाजपने १३२ जागा जिंकून ‘मोठा भाऊ’ म्हणून आपले वर्चस्व सिद्ध केले, तर शिवसेना (शिंदे गट) ५७ जागांसह ‘मधला भाऊ’ ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ‘लहान भाऊ’ म्हणून सत्तास्थानाचा भागीदार झाली.
चित्राताई वाघ यांनी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यक्षमतेची चुणूक दाखवली आहे, तर माधुरीताई मिसाळ यांनी पर्वती मतदारसंघातून सलग चार वेळा विजय मिळवून आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. या दोन्ही नेत्यांना मंत्रीपद मिळाल्यास सोनार समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास समाजातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात या दोघींचा समावेश होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.