शूर सरसेनापती संताजी (प्रतिशोध शंभूराजांच्या हत्येचा) या डॉ. बी. जी. शेखर लिखित ग्रंथास महाराणा प्रताप शिवशंभु साहित्य गौरव पुरस्कार जाहीर….!
लाल दिवा-नाशिक,या.७ :- शूर सरसेनापती संताजी (प्रतिशोध शंभूराजांच्या हत्येचा) या डॉ. शेखर पाटील लिखित ऐतिहासिक ग्रंथास महाराणा प्रताप शिवशंभू साहित्य गौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला आणि डॉ. शेखर पाटील यांचे नाव दिग्गज अभिनेते, अभिनेत्री व थोर साहित्यिकांच्या यादीमध्ये समाविष्ट झाले. ऐतिहासिक प्रसंगांचा अभ्यास करण्यासाठी हजारो मैलांचा प्रवास करून गड-किल्ल्यांची पायपीट करुन व रणांगणांना प्रत्यक्ष भेटी देणारे, ऐतिहासिक प्रसंग हुबेहूब डोळ्यासमोर आणण्याचे कसब असणारे व संशोधनात्मक ग्रंथ निर्मिती करणारे विवेकवादी इतिहासकार म्हणून उदयास आलेले डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या शूर सरसेनापती संताजी या ग्रंथाला साहित्य क्षेत्रातील सदरचा मानाचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
छत्रपती शिवाजी राजांच्या सौभाग्यवती महाराणी सईबाई भोसले यांच्या पवित्र स्मृतीने पावन झालेल्या फलटणच्या ऐतिहासिक नगरीतील सन १९७३ मध्ये स्थापन झालेल्या जयहिंद मंडळातर्फे देण्यात येत असलेल्या या पुरस्कारासाठी प्रसिद्ध इतिहासकार व लेखक पानिपतकार श्री. विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिभाशाली लेखकांच्या समितीने या सर्वोत्कृष्ट निर्मितीची दखल घेत त्यास सन २०२४ चा साहित्यातला मानाचा पुरस्कार घोषित केला आहे. येत्या २४ जानेवारी रोजी सदर पुरस्काराचे वितरण होत आहे.
शूर सरसेनापती… संताजी (प्रतिशोध शंभूराजांच्या क्रूरहत्येचा) या… ऐतिहासिक ग्रंथात १. बालसिंहाने फाडीले वाघाला, २. अफजलखानाचे स्वराज्यावरील आक्रमण, ३. राजगडाकडे कूच, ४. झुंज वादळाची, ५. शिवाजी महाराजांचा दरबार, ६. संभाजी राजांचे रक्षण अद्वितीय पराक्रम, ७. बादशहाचा कपटी डाव शंभूराजांचा घात, ८. रायगडावरील काळं स्वप्न, ९. रायगडाला वेढा, १०. राजाराम महाराजांवरील हल्ला, ११. राजाराम महाराजांचा पाठलाग, १२. संताजीचा बलिदानाचा निर्धार क्रांतीची आग, १३. शाही तख्तावरील छाप्याची तयारी, १४. औरंगजेबावरील प्राणघातक हल्ला शाही तख्ताचे नाक कापले, १५. बदल्याची आग प्रतिशोध शंभू राजांच्या क्रूर हत्येचा, १६. चुडियोंका तोहफा, १७. शाही पाहुण्यांची वरात शाही तख्ताची लक्तरे, १८. शंभूराजांच्या क्रूर हत्येचा बदला, हिम्मतखानाचा अंत, १९. स्वराज्यरक्षक ममलकतमदार क्रांतिवीर संताजी या स्वरूपात डॉ. शेखर पाटील यांनी हा ऐतिहासिक लेखा-जोखा शब्दांकित केला आहे. १२६ संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी संताजी घोरपडेंचा स्वराज्यभक्ती जीवनयज्ञ ग्रंथबध्द केला आहे.
शिवरायांचे बालपण ज्या भूमीत गेले तिथेच श्री. शेखर पाटील यांचेही बालपण गेलं. शिवरायांच्या अंगी असलेल्या वीर रसाची प्रेरणा जणू त्यांना मिळाली असावी. देशभक्तांच्या अतुलनीय शौर्यगाथांचा अंतःकरण ओतुन अभ्यास, चिंतन करुन शिवशाहीत स्वराज्य निर्मितीसाठी ज्या देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी उत्तुंग आविष्कार घडविले, भीमपराक्रमाचे दीपस्तंभ निर्माण केले, त्याच्या तुताऱ्या, पोवाडे, हुंकार शिवनेरीतून आजही ऐकू येतात. ते ऐकूनच शेखर पाटलांमधील अक्षरयात्री कृतिशील झाला.
डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी १. शोध, २. प्रतिशोध, ३. प्रबोधिनी संकेत, ४. प्रतिबंध, ५. पोलीस अंमलदाराचे अधिकार व कर्तव्ये, ६. मोर्णाकाठचे दवबिंदू, ७. दक्षता लेखन, ८. शोध सत्याचा, ९. रानजुई, १०. शूर सरसेनापती संताजी घोरपडे अशा एकुण १० अक्षरपुष्पांची निर्मिती केलेली आहे. याशिवाय पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकापासून ते युनायटेड नेशन्स यु. एन. शांतता पदक अशी १७७ सन्मानपदके व बक्षिसे त्यांना प्राप्त आहेत. माणूस कुठे काम करतो, सेवा करतो यापेक्षा प्राप्त परिस्थितीत तो प्रत्येक क्षणाचा व प्रत्येक घटकाचा सदुपयोग करण्यासाठी अंतःकरण ओतून समर्पित होतो हे जीवनसूत्र लेखकाच्या हृदयस्थानी असल्याचा अनुभव या पुस्तकातून येतो.