श्रद्धा आणि वादाचा ‘संगम’: कपालेश्वर मंदिरात दानपेट्या सील!
श्रद्धा आणि विश्वासाचे प्रतीक असलेल्या कपालेश्वर मंदिरात वादाचे काटे पेरले गेले आहेत.
लाल दिवा-नाशिक,दि.
२७:-नाशिकच्या श्रद्धास्थानाचे केंद्रबिंदू असलेल्या श्री कपालेश्वर मंदिरात सध्या वादाचे वारे वाहू लागले आहेत. देवेंद्र पाटील आणि राहुल बोरीचा यांच्या तक्रारींच्या धुराळ्यातून मंदिरातील दानपेट्यांना ‘सील’चा ‘प्रसाद’ मिळाला आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या गुरव कुटुंबातील वादाच्या आगीत आता दानपेट्याही होमण्याची वेळ आली आहे.
धर्मदाय उपायुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालत तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी, पंचवटी पोलिसांच्या बंदोबस्तासह कपालेश्वर मंदिरात दाखल झाले. सर्वत्र तणावाचे वातावरण असताना मंदिरातील पाचही दानपेट्यांना सील लावण्यात आले. या कारवाईचा अहवाल धर्मदाय उपायुक्तांना सादर करण्यात आला आहे.
पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड साहेब यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी बंदोबस्ताची जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडली.
या प्रसंगी कपालेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अक्षय कलंत्री, सचिव अॅड. प्रशांत जाधव, उपाध्यक्ष सुनील पटेल, खजिनदार श्रीकांत राठी, विश्वस्त मंडळाचे सदस्य काळे, श्रद्धा कोतवाल, दुसाने आणि रावसाहेब कोशिरे हे उपस्थित होते.
कपालेश्वर मंदिरातील हे वादळ आता कोणत्या वळणावर जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.