शिवीगाळ म्हणजे मृत्यूची शिक्षा? सराईत गुन्हेगार गट-याने घेतला भीषण बदला
पोलीसांच्या अथक प्रयत्नांना यश: कोशिरे मळा येथील बेवारस मृतदेह प्रकरणाचा छडा लावला, सराईत गुन्हेगार गट-याला झाली अटक
लाल दिवा-नाशिक, दि. १०/१०/२०२४दिड महिन्यापूर्वी पंचवटी येथे बेवारस अवस्थेत मिळून आलेल्या मृतदेहाचा छडा लावत गुन्हेशाखा युनिट १ ने सराईत गुन्हेगार सुनिल उर्फ गट-या गायकवाडसह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
दिनांक ३१/०८/२०२४ रोजी पंचवटी येथील कोशिरे मळयालगत रामवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पंढरीनाथ उर्फ पंड्या रघुनाथ गायकवाड या इसमाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हेशाखा उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट १ ने तपास सुरू केला.
या प्रकरणी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील गायकवाड उर्फ गट-या याने त्याच्या चुलतभाऊ अशोक गायकवाड याच्या मदतीने दीड महिन्यांपूर्वी पंढरीनाथ गायकवाड याचा खून केल्याची माहिती समोर आली.
पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार रविंद्र आढाव, महेश साळुंके, शरद सोनवणे, पोलीस नाईक मिलिंदसिंग परदेशी, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, अप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे आणि समाधान पवार यांनी सापळा रचून सुनील गायकवाड उर्फ गट-या आणि विकास गायकवाड या दोघांनाही अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील उर्फ गट-या याच्या कौलारू घरात पंढरीनाथ उर्फ पंड्या याने त्याला शिवीगाळ केली होती. त्याचा राग मनात धरून सुनीलने लाकडी दांड्याने मारहाण करून पंढरीनाथचा खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी विकास गायकवाड आणि साहिल शिंदे यांच्या मदतीने मृतदेह रिक्षातून नेऊन पंचवटीतील कोशिरे मळा परिसरात टाकून देण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील उर्फ गट-या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध गुन्ह्यांमध्ये २५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४९/२०२४ भादंवि कलम १०३(१), २३८, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी साहिल शिंदे यालाही अटक करण्यात आली असून पुढील तपास गंगापुर पोलीस करीत आहेत.