शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना माघार घेण्याचे आदेश! राजश्री अहिरराव आणि धनराज महाले ‘नॉट रिचेबल’!
शिंदे गटात काय चाललंय? उमेदवारांना माघारीचे आदेश का?
लाल दिवा-नाशिक,दि.३:-राजकीय र्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या शिवसेनेने एबी फॉर्म दिलेल्या दोन उमेदवारांना अचानक माघार घेण्याचे आदेश देण्यात आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. देवळाली मतदारसंघातील उमेदवार राजश्री अहिरराव आणि दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार धनराज महाले यांना माघारीचे आदेश देण्यात आल्याचे समजते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हे आदेश मिळाल्यानंतर दोन्ही उमेदवार संपर्काबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे फोन स्विच ऑफ असून, कोठेही त्यांचा शोध लागत नसल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
हा निर्णय अचानक का घेण्यात आला, याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, शिंदे गटातील अंतर्गत राजकारण, दबावतंत्र किंवा अन्य काही कारणे असू शकतात, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या दोन उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडले गेले का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी प्रसारमाध्यमे धडपड करत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नवे वळण आले आहे. यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेची प्रतिमा डागाळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजश्री अहिरराव आणि धनराज महाले लवकरच आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी अपेक्षा आहे. तरीही, या प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.