शहीदांच्या स्मृतीप्रित्यर्थ घोटी येथे २६/११ मॅरेथॉन; नलिनी कड ब्रँड अँबेसिडर
नलिनी कडसोबत धावा; घोटीत शहीद मॅरेथॉन
लाल दिवा नाशिक,दि.१०:- नाशिक रोड: २६/११ च्या दुःखद घटनेतील शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी येत्या २६ नोव्हेंबर रोजी घोटी (ता. इगतपुरी) येथे १४ व्या शहीद मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनसाठी नाशिक पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी धावणार असून, या उपक्रमासाठी नलिनी कड यांना ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
ही मॅरेथॉन चार गटांत आयोजित करण्यात आली असून, मुंबई, पुणे, सांगलीसह विविध शहरांतील धावपटू सहभागी होणार आहेत. शहीदांच्या स्मृती जागवण्यासाठी जनजागृती करणे हा या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश असल्याचे माजी सैनिक व मॅरेथॉन धावपटू भाऊसाहेब बोराडे यांनी सांगितले.
या मॅरेथॉनच्या टी-शर्टचे अनावरण नुकतेच नाशिक रोड येथील ग्रेप सिटी सभागृहात संपन्न झाले. याप्रसंगी ब्रँड अँबेसिडर नलिनी कड, सिन्नर येथील फ्रुट्स इन कंपनीचे जनरल मॅनेजर वीरेंदर पवार, सेवानिवृत्त डीआयजी राणा, महाराष्ट्र बँकेचे मॅनेजर परमार, राष्ट्रीय धावपटू तानाजी भोर, युवा प्रशिक्षक मनोज मस्के, उद्योजक राणी बोराडे, अरुण पाटील, जयवंत देसाई, सावताराम काकडे, संजय शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
“शहीदांच्या कुटुंबीयांसाठी आम्ही या स्पर्धेत पोलीस बांधवांसह धावपटूंचा सहभाग मिळवत आहोत. शहीदांसाठी धावण्याचा संकल्प आम्ही करीत आहोत.” असे मत ब्रँड अँबेसिडर नलिनी कड यांनी व्यक्त केले.
(फोटो)
२६/११ शहीद मॅरेथॉनच्या टी-शर्टचे अनावरण करताना ब्रँड अँबेसिडर नलिनी कड, वीरेंदर पवार, भाऊसाहेब बोराडे, तानाजी भोर, मनोज मस्के व इतर धावपटू.