वेतन पडताळणीचा सुळसुळाट, जिल्हा परिषदेतील अधिकारी लाचखोरीच्या विळख्यात!
शिक्षकांना लुटणारे ‘शिक्षा’ पासून वाचणार नाहीत!
लाल दिवा-नाशिक,१८:- शिक्षकांची सेवापुस्तकेच ठरली जिल्हा परिषदेतील दोन अधिकाऱ्यांना महागडी! वेतन पडताळणीच्या कामासाठी तब्बल ११ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही धडाकेबाज कारवाई शिक्षण क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडवून गेली आहे.
जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात मंगळवारी हा थरार घडला. शिक्षकांच्या सेवापुस्तकांवर वेतन पडताळणीची सही टाकण्यासाठी कनिष्ठ लेखाधिकारी किरण रंगनाथ दराडे (४०) यांनी शिक्षकांकडून प्रति सेवापुस्तक ७०० रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ११ हजारांवर डील ठरली. मात्र चलाख शिक्षकाने लाचलुचपत विभागाला संपर्क साधून सर्व माहिती दिली.
पोलीस निरीक्षक श्रीमती मीरा वसंतराव आदमाने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ११ हजारांची रक्कम स्वीकारताना दराडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही रक्कम त्यांना कनिष्ठ सहाय्यक (लेखा) सचिन प्रभाकर पाटील (४०) यांनी दिल्याचे निष्पन्न झाले.
दोनही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रात घसरत चाललेल्या नैतिकतेचे हे प्रकरण प्रतीक बनले आहे.