सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी कै. शंकर बो-हाडे कुटुंबीयांशी संवाद साधला,….!
लाल दिवा-नाशिक,ता.१४ : सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना शेकोटी साहित्य संमेलनाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा कै. डॉ. शंकर बो-हाडे लोककला पुरस्कार जाहीर झाला असून त्यांनी या पुरस्कार व शेकोटी साहित्य सम्मेलनाच्या पार्श्वभूमीवर कै. शंकर बो-हाडे यांच्या निवासस्थानी भेट देत कै शंकर बो-हाडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत बो-हाडे कुटुंबीयांशी संवाद साधला आहे. यावेळी नाशिक रोड शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करुन नाशिक रोड शिवजन्मोत्सव सोहळ्याची माहिती देउन त्यांना आमंत्रण दिले आहे.
यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना “नाशिकच्या रसिक प्रेक्षकांची कलावंत म्हणून मला नेहमी भरभरुन साथ लाभली असून नटरंगी नार सारख्या कार्यक्रमातुन नाशिककरांनी ते दाखवून दिल्याची आठवण करून देत तमाम नाशिकककर प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. या शिवाय आपण नाशिक शहरात लवकरच एक नृत्य अकादमी सुरू करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. या नृत्य अकादमीतून युवा कलावंतांना विशेषतः गोरगरीब मुलींना कथ्थक, भरतनाट्यमव विविध वाद्यसंगीतासह सर्व प्रकारचे शिक्षण, प्रशिक्षण देण्यात येईल आणि त्यांना चित्रपट सृष्टीत कलावंत म्हणून स्वतः सिद्ध करून दाखवता येईल. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नाशिक मधील अकादमीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील आणखी काही कलावंत लवकरच चित्रपट सृष्टीत झळकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कलावंतांना आतापासूनच या अकादमीच्या सुरू होण्याचे वेध लागले असून भविष्यात त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.