रचनाच्या चिमुकल्यांनी साकारले शाडू मातीचे गणपती…!
लाल दिवा -नाशिक,दि.११ : नाशिक – येथील महाराष्ट्र समाज सेवा संघ संचालित रचना माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरकता जोपासावी, इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा याचा एक भाग म्हणून शाडू माती पासून गणपती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन पीओपी चा वाढता वापर पर्यावरणास घातक ठरत आहे. यास पर्याय म्हणून शाडू माती, पानाफुलांचा पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करावा या उद्देशाने रचना इको क्लब व रचना आर्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने येथील एस. एम. जोशी सभागृहाच्या प्रांगणात जवळपास 150 विद्यार्थ्यांच्या सहभागने ही कार्यशाळा संपन्न झाली. विद्यार्थी नैसर्गिक रंग वापरून मूर्तीला रंग देऊन याच गणपतीची आपापल्या घरी स्थापना करतील. या कार्यशाळेस महाराष्ट्र समाज सेवा संघ संस्थेचे अध्यक्ष श्री सुधाकर साळी, उपाध्यक्षा श्रीमती हेमा पटवर्धन,सचिव श्री शांताराम अहिरे,सहसचिव श्री पंकज पवार, कोषाध्यक्ष श्री निरंजन ओक,कार्यकारणी सदस्य श्री.मधुकर फटांगरे,श्री यशवंत ठोके, श्री.निलेश ठाकूर,सौ. कीर्ती सावंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ संगीता टाकळकर, पर्यवेक्षक श्री शिवदास महाजन यांनी कार्यशाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. “विद्यार्थ्यांनी घरगुती गणपती सजावट करताना प्लास्टिक, थर्माकोल व जास्तीची लाइटिंग न वापरता पर्यावरण पूरक सजावट करावी” असे आवाहन श्री सुधाकर साळी यांनी केले. कलाशिक्षक श्री संतोष मासाळ यांनी विद्यार्थ्यांना मूर्ती बनवण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संयोजन रचना इको क्लबच्या प्रमुख सौ वैशाली कुलकर्णी, सौ.नयना हिरे यांनी केले