जलद कारवाई: निवडणूक प्रशिक्षण बुडवणाऱ्या ९ अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केले निलंबित
प्रशिक्षणाला गैरहजर, ९ अधिकाऱ्यांची निलंबनाची शिक्षा
लाल दिवा-नाशिक,दि,१९:-दिंडोरी (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आयोजित प्रशिक्षणास गैरहजर राहून निवडणूक कामात अडथळा निर्माण करणाऱ्या ९ अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी शर्मा यांनी जलद कारवाई करत त्यांना निलंबित केले आहे. लक्ष्मण विठ्ठल आहेर, चंद्रकांत धर्मा थविल, महेद्र नामदेव पवार, श्यामकुमार भटु बोरसे, हिरामण महारु सुर्यवंशी, अमोल शिवाजी खालकर, तारीक अस्लम उस्मान गणी, चेतन अशोक कुंदे आणि मोहन महादु चौधरी
या सर्व ९ अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या त्वरित कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिनांक २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या १२२ दिंडोरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १९ नोव्हेंबर रोजी मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. मात्र, वर नमूद केलेले हे ९ अधिकारी प्रशिक्षणास गैरहजर राहिले. नायब तहसीलदार वसंतराव रामचंद्र धुमसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशिक्षणास गैरहजर राहून निवडणूक कामात अडथळा निर्माण केला. त्यांच्या गैरहजेरीमुळे निवडणूक प्रक्रियेत विलंब झाला.
जिल्हाधिकारी शर्मा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाईचे आदेश दिले. सर्व ९ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. निवडणूक काळात कोणतीही कर्तव्यच्युती खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. या जलद कारवाईमुळे इतर कर्मचाऱ्यांमध्येही एक प्रकारची दक्षता आली असून, निवडणूक कामकाज अधिक जबाबदारीने पार पाडले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.