पोळ्याच्या सणातून परतताच दारात चोरीचा धक्का! म्हसरूळ हद्दीत घरातून पावणेतीन लाखाचे दागिने आणि गॅस सिलिंडर लंपास!
लाल दिवा-नाशिक,दि.४:– -शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहारानगर भागात एका घरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोळा सणा निमित्त गावी गेलेल्या कुटुंबाला परतताच दारात चोरीचा धक्का बसला. चोरट्यांनी घरातून २ लाख ६५ हजार ९९१ रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने आणि एक गॅस सिलिंडर लंपास केल्याची घटना घडली आहे.
चंद्रकांत दादाजी शिरोळे (३१) असे फिर्यादीचे नाव असून, ते पत्नीसह पोळा साजरा करण्यासाठी मूळ गावी मालेगाव येथे गेले होते. १ सप्टेंबर रोजी रात्री ते घरातून बाहेर पडले आणि ३ सप्टेंबर रोजी सकाळी परतले तेव्हा घराचे कुलूप तुटलेले आढळून आले. आत गेल्यावर घरातील कपाटे उघडी होती आणि सर्वत्र सामान विस्कळीत पडले होते.
श्री. शिरोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी त्यांच्या घरातून २ लाख ६५ हजार ९९१ रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने आणि एक भारत गॅसचा सिलिंडर चोरून नेला आहे. घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून फिंगरप्रिंट एक्स्पर्ट आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने पुरावे गोळा केले आहेत.
घटनेची नोंद म्हसरूळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सध्या आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना जेरबंद केले जाईल असे पोलिसांनी सांगितले.